कोल्हापूर : डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ | पुढारी

कोल्हापूर : डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागामध्ये रोज एका नवीन गावाला डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या साथीला तोंड द्यावे लागत आहेत. एप्रिल महिन्यापासून कोणत्या कोणत्या गावात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होत आहे. आरोग्य विभाग मात्र बढत्या आणि बदल्यांच्याच कामात गुंतला असल्यामुळे त्यांना इकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे दिसते. गेल्या दोन दिवसांपासून तेरवाडमध्ये साथ पसरली आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. सध्या पाण्याच्या टंचाईमुळे अनेक गावांमध्ये एक, दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवत आहेत. तसेच गावातील गटर्सची स्वच्छता ठेवण्यात येत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. पाणी साठवत असताना नागरिकांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे या स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे तापाचे रुग्ण प्रत्येक गावात कमी-अधिक आढळून येऊ लागले आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे डेंग्युसद़ृष्य आजाराने तिघांचा मृत्यू झाला. याशिवाय आलास, टाकळी, तेरवाड याठिकाणीही साथीची लागण झाली आहे.

साथीने गंभीर रूप धारण केल्यानंतरच आरोग्य विभागाचे त्या गावाकडे लक्ष जाते. तापाचे रुग्ण आढळून येत असले तरी सर्वेक्षण अहवाल पाठविण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे घरोघरी होणार्‍या सर्वेक्षणाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. साथीमध्ये महत्त्वाची जबाबदारी असते ती जिल्हा हिवताप कार्यालयाची. परंतु, या कार्यालयालाच ताप आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पूर्णवेळ अधिकारी नाही. फिरती करण्यासाठी वाहन नाही, अशी स्थिती या कार्यालयाची आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी साथीच्या आजारात वाढ झाल्याने तातडीने उपायोजना आखण्याच्या सूचना ग्रामसवेकांना दिल्या आहेत.

डेंग्यूची लक्षणे

अचानक ताप येणे, तीव्र सांधे आणि स्नायू वेदना, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ, पोटदुखी, थकवा, अस्वस्थता, चिडचिड, नाकातून, हिरडीतून रक्तस्राव.

काय करावे

दाट गर्दीच्या निवासी भागांपासून दूर राहा. फुल शर्ट वापरावेत. खिडक्या शक्यतो बंद ठेवा किंवा पडदे सुरक्षित असल्याची खात्री करा. झोपताना मच्छरदाणी लावावी. लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटणे. औषध फवारणी करणे.

काय करू नये

तळलेले, प्रक्रिया केलेले, जंक, मसालेदार पदार्थ खाऊ नये. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नका.

Back to top button