शाहू सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार | पुढारी

शाहू सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार

कागल : पुढारी वृत्तसेवा

देशातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नवी दिल्‍लीच्या नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज या संस्थेने येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे. गळीत हंगाम 2020-21 साठी हा पुरस्कार मिळाला असून शाहू साखर कारखान्याचा आजअखेर 64 पुरस्कारांनी गौरव झाला आहे.

या पुरस्कार निवडीबाबतचे पत्र राष्ट्रीय साखर महासंघाचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी कारखान्यास पाठवले आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता एनसीयूआय सभागृह, 3 ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्‍ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी गुरुवारी दिली.

पुरस्कार जाहीर होताच कारखाना कार्यस्थळावर आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला. कारखाना प्रांगणातील आराध्य दैवत राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.

नामांकित पुरस्कारांनी गौरव

शाहू साखर कारखान्यास यापूर्वी भारतातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार हंगाम 2002-03, हंगाम 2007-08 व हंगाम 2013-14 असा तीन वेळा मिळाला आहे. आता हंगाम 2020-21 साठी चौथ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे.
राष्ट्रीय पातळीवरील हा 23 वा पुरस्कार आहे. शाहू कारखान्याला राज्य पातळीवरील 41 पुरस्कार मिळाले आहेत. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट साखर कारखाना – 4, उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना-11, तांत्रिक कार्यक्षमता-22, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन -9, उत्कृष्ट ऊस विकास व्यवस्थापन-9, उत्कृष्ट डिस्टिलरी व्यवस्थापन-1, जास्तीत जास्त साखर निर्यात-2, प्रशंसा प्रशस्तीपत्र – 1, इतर पुरस्कार – 5 असे एकूण 64 पुरस्कार कारखान्यास मिळाले आहेत.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या कारकिर्दीत कारखान्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्कारांची संख्या 55 आहे. त्यांच्या पश्‍चात विद्यमान चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या कारकिर्दीतील हा नववा पुरस्कार आहे.

हा शाहू परिवारातील प्रत्येक घटकाचा गौरव

पुरस्कार घोषणेनंतर प्रतिक्रिया देताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले, कारखान्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हिताच्या कृतीचा वारसा, कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे व त्याला कारखान्याच्या सभासद, शेतकर्‍यांनी दाखवलेला विश्‍वास आणि प्रामाणिकपणाने दिलेली साथ, व्यवस्थापनाच्या नियोजनास अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार यांच्या कष्टाची जोड याचाच हा गौरव आहे. राष्ट्रीय पातळीवर झालेला हा गौरव कुणा एका व्यक्‍तीचा नसून संपूर्ण शाहू परिवारातील प्रत्येक घटकाचा गौरव आहे.

Back to top button