‘समीर वानखेडे यांनी दुबई, मालदीवमध्ये कलाकारांकडून पैसे उकळले’ | पुढारी

‘समीर वानखेडे यांनी दुबई, मालदीवमध्ये कलाकारांकडून पैसे उकळले’

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खानच्या अटक प्रकरणावरून ‘एनसीपी विरुद्ध एनसीबी’ असा सामना रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना गुरुवारी पुन्हा लक्ष्य केले. वानखेडे दुबई, मालदीवमध्ये सिने कलाकारांसमवेत दिसले होते. या कलाकारांकडून त्यांनी पैशांची वसुली केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात बॉलीवूडमधील अनेक हस्ती दुबई आणि मालदीवमध्ये होत्या. तेव्हा वानखेडे हेही आपल्या कुटुंबासमवेत त्याठिकाणी गेले होते. वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांचे सोशल मीडियावरील एक छायाचित्रही मलिक यांनी आधार म्हणून दिले आहे.

वानखेडेंच्या परिवारातील लोक मालदीवमध्ये काय करीत होते? ते स्वतः त्या ठिकाणी होते का, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असे मलिक म्हणाले. एक छायाचित्र दाखवित वानखेडे दुबईमध्येही वसुली करीत आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.

दुबईला गेलोच नाही :वानखेडे

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेले आरोप वानखेडे यांनी खोडून काढले आहेत. आपण दुबईला कधी गेलोच नाही. मालदीवला परवानगी घेऊन स्वःखर्चाने गेलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ड्रग्ज रॅकेटसंबंधी कारवाई सुरू झाल्यापासून काहीजण माझ्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. मलिक पूर्णतः खोटे बोलत आहेत. त्यांनी हे प्रकार आता थांबवावेत, मी त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठविणार आहे. सध्या कामात जास्त व्यस्त असून अशा निराधार आरोपांना उत्तर देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. मंत्री असूनही ते धादांत खोटे बोलत असल्याचेही वानखेडे यावेळी म्हणाले.

वानखेडे येत्या वर्षभरात तुरुंगात असतील

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे म्होरके आहेत. त्यांची बोगसगिरी जनतेसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. वानखेडे यांची वर्षभरात नोकरी जाईल व त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्‍ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवारी पुण्यात दिला. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी भाजप केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशीचा खटाटोप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. या केंद्रीय एजन्सींना कितीही चौकशा करू द्या, त्यांच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही, असेही ते म्हणाले. वडगाव मावळ येथे ते राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या आढावा बैठकीत बोलत होते. मलिक म्हणाले, की समाजाची उन्‍नती हाच अल्पसंख्याक विभागाचा खरा उद्देश आहे. विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचला पाहिजे.

 

हेही वाचा : 

Back to top button