मुंबईतील पेट्रोल दरात यावर्षी तब्बल २४ टक्क्यांनी भडका - पुढारी

मुंबईतील पेट्रोल दरात यावर्षी तब्बल २४ टक्क्यांनी भडका

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील पेट्रोल दरात यावर्षी तब्बल 24 टक्क्यांनी भडका उडाला असून डिझेल दरही 28 टक्क्यांनी भडकल्याची माहिती आहे. परिणामी, वर्षाच्या सुरुवातीला प्रतिलीटर 90.34 रुपयांवर असलेले पेट्रोल गुरुवारी 112.44 रुपयांवर पोहोचले आहे. तसेच डिझेलचे दरही प्रतिलिटर 80.50 रुपयांवरून 103.26 रुपयांवर गेले आहेत.

मुंबईकरांना जून महिन्यापासून इंधन दरवाढीचे चटके अधिक जाणवू लागले. कारण मुंबईत 31 मेपासून एक लिटर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. 1 जूनपासून एकदाही पेट्रोलचे दर शंभरीखाली आलेले नाहीत. याउलट चार महिन्यांत त्यात आणखी 12 टक्क्यांची वाढच झाली आहे. डिझेल दराबाबतही मुंबईकरांना अधिक झळा सहन कराव्या लागत आहेत. कारण मुंबईत 9 ऑक्टोबरला डिझेल दरानेही शंभरी ओलांडली आहे. त्यानंतर डिझेलच्या दरात सातत्याने 9वेळा वाढ झाली आहे. परिणामी, या वर्षात डिझेल दरामध्ये 28 टक्क्यांपर्यंत भडका उडाला आहे.

डिझेल दरवाढीविरोधात माल वाहतूकदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची नुकतीच यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत लवकरच इंधन दरवाढीला ब्रेक लावत केंद्र शासनाने इंधन दर आवाक्यात आणण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. तसेच केंद्र शासनासोबत चर्चा करून तत्काळ माल वाहतूकदारांना दिलासा देण्याची गरज व्यक्त झाली. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाकडून दिलासा मिळाला नाही, तर वाहतू कदारांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा 35 पैसे वाढ

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे प्रतिबॅरलचे दर 86 डॉलर्सवर पोहोचल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी सलग दुसर्‍या दिवशी गुरुवारी इंधन दरात 35 पैशांची वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर इंधन दराने आणखी एक उच्चांकी स्तर गाठला आहे.

मुंबईतील पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 112.44 रुपयांवर गेले असून, डिझेलचे दर 103.26 रुपयांवर गेले आहेत. देशाची राजधानी दिल्‍लीमध्ये हेच दर क्रमशः 106.54 आणि 95.27 रुपयांवर गेले आहेत. चेन्‍नई येथे इंधन दर क्रमशः 103.61 आणि 99.59 रुपयांवर गेले आहेत. तर, कोलकाता येथे पेट्रोल 107.12 रुपयांवर गेले असून डिझेल 98.38 रुपयांवर गेले आहे.

Back to top button