अपहरण-खंडणीतही उत्तर प्रदेश, प.बंगाल कुप्रसिद्ध! | पुढारी

अपहरण-खंडणीतही उत्तर प्रदेश, प.बंगाल कुप्रसिद्ध!

कोल्हापूर : सुनील कदम : अपहरण आणि खंडणीसाठी उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल ही दोन राज्ये कुप्रसिद्ध असून त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. प्रामुख्याने खंडणी उकळणे, खून, वेश्या व्यवसाय, भीक मागणे आणि लग्‍नाच्या कारणातून अपहरणाचे बहुसंख्य प्रकार होत असल्याचे निष्पन्‍न झाले आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या 2020 च्या अहवालात देशभरातील अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. देशातील एकूण 18 राज्यांमध्ये अपहरणाचे जास्त गुन्हे घडत असल्याचे दिसून येते. 2020 साली देशभरात अपहरणाचे एकूण 88,590 गुन्हे नोंद झालेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 13,590 गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशातील आहेत.

त्याच्या खालोखाल पश्‍चिम बंगाल 9,453, महाराष्ट्र 8,271, आसाम 8,117 आणि बिहार 7,961 गुन्हे यांचा क्रम लागतो. देशातील आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा,

झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही अपहरणाच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

बिहार, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये अपहरणानंतर संबंधित व्यक्‍तीच्या खुनाचे प्रमाण जास्त आहे. बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात लग्‍नासाठी मुली आणि महिलांचे अपहरण करण्याच्या घटना सर्वाधिक असल्याच्या दिसून येतात. आसाम आणि झारखंड भागातून प्रामुख्याने वेश्या व्यवसायासाठी आणि भीक मागण्याच्या कामासाठी लहान मुले आणि मुलींचे अपहरण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजधानी दिल्लीमधूनही वर्षाकाठी दोन हजारहून अधिक अपहरणाचे गुन्हे होताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरमध्येही अपहरणाचे प्रमाण लक्षणीय आहे. अपहृत मुली आणि महिलांपैकी जवळपास 50 टक्के अपहरणाचे गुन्हे त्यांच्याशी लग्‍न करण्याच्या हेतूने होत असल्याचेही उघडकीस आले आहे. कधी परस्परसंमतीने तर कधी कुणा एकाच्या पसंतीने अपहरणाचे प्रकार होताना दिसून येत आहेत.

अपहरणांच्या गुन्ह्यांना मानवी तस्करीचीही एक किनार आहे. देशभरात वर्षाकाठी जवळपास दोन हजार मानवी तस्करीच्या घटना उघडकीला येतात. त्यामध्ये प्रामुख्याने मुली व महिलांचा समावेश असलेला दिसत आहे. आसाम, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून मानवी तस्करीचे प्रकार जास्त चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजधानी दिल्लीतूनही वर्षाकाठी दोनशेहून अधिक प्रमाणात मानवी तस्करी होत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्टपणे पुढे आले आहे. ही मानवी तस्करी प्रामुख्याने वेश्या व्यवसायासाठी होत असल्याचे जाणवते.

हरविलेल्यांपैकी बहुतेकांचे अपहरणच!

देशभरात अपहरण झालेल्या व्यक्‍तींबाबत सुरुवातीला हरविल्याची तक्रार देण्यात येते. मात्र, शहानिशा केल्यानंतर हरविलेल्यांपैकी जवळपास 25 टक्के लोकांचे वेगवेगळ्या कारणांसाठी अपहरण झाल्याचे चव्हाट्यावर येते. 2020 साली देशभरात हरविल्याची नोंद असलेल्या व्यक्‍तींपैकी 22 हजार 222 व्यक्‍तींचे तपासाअंती अपहरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर हरविलेल्या किंवा अपहरण झालेल्या व्यक्‍तींचा शोध घेताना अपहृत व्यक्‍तीचे वय, महिला की पुरुष, सधन वर्गातील की गोरगरीब कुटुंबातील, पूर्ववैमनस्य, प्रेमप्रकरण यासह अनेक शक्यता गृहीत धरून पोलिसांना संबंधितांचा शोध घ्यावा लागतो.

Back to top button