न्यूनगंड, नकारात्मक विचार काढून टाका; यश निश्चित : जिल्हाधिकारी राहुल रेखावार | पुढारी

न्यूनगंड, नकारात्मक विचार काढून टाका; यश निश्चित : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : प्रत्येकजण हुशार आहे. मात्र, आजूबाजूच्या लोकांमुळे आपली वेगळी प्रतिमा बनते, असे होत नाही. विद्यार्थी कशात हुशार आहे हे जाणून घेतले पाहिजे. न्यूनगंड, नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार करावा. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांचे स्वप्न, करिअरचा योग्य निर्णय व शिकत राहण्याची वृत्ती ठेवल्यास काहीच कमी पडणार नाही. आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होऊन तुम्ही इतरांसाठी आदर्श व्हाल, असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै.‘पुढारी’ एज्यु दिशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शनाचे शनिवारी डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे विद्यार्थ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्रा. मोटेगावकर सरांचे ‘आरसीसी’ लातूरचे प्रा. प्रमोद घुगे, ‘एमआयटी’-एडीटी युनिव्हर्सिटी पुणेचे प्रा. डॉ. राजेश जाधव, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी पुणेचे प्रा. स्वप्निल सोनकांबळे, अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगावचे चेअरमन विजयसिंह माने व चाटे शिक्षण समूह कोल्हापूरचे प्रमुख प्रा. भारत खराटे प्रमुख उपस्थित होते. संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप, वाठार तर्फ वडगाव व चाटे शिक्षण समूह कोल्हापूर सहप्रायोजक आहेत.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, आज प्रत्येकजण पैसे, प्रतिष्ठेच्या मागे धावत आहे; परंतु आयुष्यात शिक्षण व ज्ञान या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी हुशार असतो, हे पालक व शिक्षकांनी शोधले पाहिजे. पाल्यांना आवडीचे क्षेत्र निवडीसाठी मदत करावी. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार हुशार व सामान्य विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता हा फरक आहे. एकाग्रता असणारा हुशार असतो. रोज अर्धा तास एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत. ज्या समाजात राहतो त्यासाठी कर्तव्यभावना म्हणून आठवड्यातील दोन तास विनामूल्य स्वयंसेवक बनून काम करावे. तेव्हाच जग कळेल, स्वत: जबाबदार नागरिक असल्याचे भान येईल व समाजाला कशाची गरज आहे हे समजेल.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, कोणता कोर्स व शाखेला प्रवेश घ्यावा हे पालकांना माहीत नसते. आज गुगल, सोशल माध्यमे व इंटरनेटमुळे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत प्रचंड संधी आहेत. नवीन शाखा निर्माण होत आहेत. पर्यायांचा भडिमार होत असताना कशावर भर द्यायचा याचा पालक, विद्यार्थ्यांनी विचार करावा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय द़ृष्टिकोन ठेवून पहिल्या दिवसापासून सर्व विषयांचे ज्ञान घ्यावे लागणार आहे.

सध्याचे शिक्षण चार भिंतीच्या आतील राहिलेले नाही. नवनवीन संकल्पना सत्यात उतरविण्याची ही वेळ आहे. विद्यार्थ्यांनी करिअर करताना चांगली संस्था निवडण्याबरोबरच तेथील पायाभूत सुविधा, टीचिंग-लर्निंग, टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेस याचा विचार करावा. ‘नॅस्कॉम’च्या अहवालानुसार स्किल्स काही वर्षेच राहतात. तेव्हा नवीन क्षेत्र व पर्यायाचा विचार विद्यार्थ्यांनी केल्यास यशस्वी होणे शक्य आहे. प्रा. घुगे म्हणाले, पाल्य मोठा व्हावा, हे प्रत्येक आई-वडील स्वप्न पाहतो, त्यामागे निःस्वार्थी भावना असते. शैैक्षणिक जीवनात जे शिकता ते कायमस्वरूपी लक्षात राहिले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी योग्य दिशा, कष्ट, मेहनत करण्याची तयारी ठेवा. दै.‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी आभार मानले.

आणखी दोन दिवस प्रदर्शन

राजारामपुरी येथील डॉ.व्ही.टी.पाटील स्मृतिभवन सभागृहात दै.‘पुढारी’च्या वतीने एज्यू दिशा शैक्षणिक प्रदर्शन रविवार व सोमवार असे दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात राज्यभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील कोर्सेसची माहिती एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे.

अ‍ॅकेडेमिक रोबोटपेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा

अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. आयुष्यात अभ्यास महत्त्वाचा असला तरी याव्यतिरिक्त काहीतरी वेगळे केले पाहिजे. जगताना शैक्षणिक पात्रता उपयोगात येत नाही. नुसते अ‍ॅकेडेमिक रोबोट म्हणून तयार होण्यापेक्षा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी विद्यार्थ्यांना केले.

Back to top button