कोल्हापूर महापालिका निवडणूक : आघाडी, युती की स्वतंत्रपणे रणांगणात? | पुढारी

कोल्हापूर महापालिका निवडणूक : आघाडी, युती की स्वतंत्रपणे रणांगणात?

कोल्हापूर, सतीश सरीकर : तब्बल अडीच वर्षांहून जास्त कालावधी झाल्याने इच्छुकांसह विविध राजकीय पक्षांचे लक्ष महापालिका निवडणुकीकडे आहे. यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे मैदानात उतरून निकालानंतर आघाडी अन् युती केली आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना आदी पक्ष आघाडी, युती करून लढणार की स्वतंत्रपणे रणांगणात उतरणार याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यावरच इच्छुकांची पुढील राजकीय वाटचाल असणार आहे. कारण एकेका प्रभागात अनेकजण इच्छुक आहेत.

महाराष्ट्रातील रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील, असे सूतोवाच आहेत. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे वक्तव्य केल्याने इच्छुकांच्या नजरा निवडणुकीकडे लागल्या आहेत. महापालिकेवर गेली दहा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. 2010-2015 व 2015-2020 या दोन्ही पंचवार्षिक निवडणुका लढताना काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली नव्हती. निकालानंतर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने हातावर घड्याळ बांधून महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविला होता. भाजप-शिवसेना या पक्षांनीही स्वतंत्रपणे रणांगणात उतरून नंतरच युती केली होती. त्यामुळे यंदाची निवडणूक त्याला अपवाद ठरणार की पूर्वीप्रमाणेच सर्वच राजकीय पक्ष एकमेकांशी सत्तेसाठी भिडणार हे लवकरच स्पष्ट होईल.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीच स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेना ठाकरे गटाला आपल्या हक्काच्या जागा देणार का, असाही प्रश्न आहे. त्यामुळे आ. पाटील व आ. मुश्रीफ हे भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्रित लढतात की स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणेच लढण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाची सूत्रे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे असतील. आम आदमी पार्टीही रिंगणात उतरणार आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे असेल. भाजपची महापालिकेतील धुरा पूर्णतः खा. धनंजय महाडिक यांच्यावर आहे. राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गट यांचे सरकार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत ते एकत्रित उतरतील, असा अंदाज आहे. परंतु भाजपसोबत ताराराणी आघाडी असेल. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार नसेल, तेथे ताराराणी आघाडीचा उमेदवार रणांगणात असेल, अशी भाजपची रणनीती आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला किती जागा मिळणार यावर युतीचा निर्णय राजेश क्षीरसागर घेण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

त्रिसदस्य की चार सदस्य?

महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार हे स्पष्ट आहे. परंतु तीन नगरसेवकांचा एक वॉर्ड की चार नगरसेवकांचा एक वॉड, याबाबत एकमत झालेले नाही. कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना त्रिसदस्य पद्धतीने झाली आहे. राज्य सरकारमधील दोन्ही राजकीय पक्षात तीन व चार नगरसेवकांचा एक वॉर्ड याबाबत मतभिन्नता आहे. त्यामुळे अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु चार नगरसेवकांचा एक वॉर्ड होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सुमारे 400 उमेदवारांची गरज…

महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि दोन्ही शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचे ठरविल्यास प्रत्येक पक्षाला तेवढ्या उमेदवारांची गरज लागेल. त्याबरोबरच आम आदमी पार्टीसह इतर पक्षही निवडणूक लढवतील. अपक्षही मैदानात उतरतील. त्यामुळे सुमारे 400 उमेदवारांची गरज लागणार आहे. निवडणूक खर्चाचा आकडा पाहता एवढे तगडे उमेदवार आणायचे कोठून, असा प्रश्न नेतेमंडळींना पडणार आहे. तुल्यबळ उमेदवार शोधताना राजकीय पक्षांना नाकीनऊ येणार आहे.

बंडखोरी रोखण्यासाठी स्वतंत्रपणे लढणार

महापालिकेत गेली दहा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडे इच्छुकांचा जास्त ओढा आहे. त्याबरोबरच आता राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची सत्ता असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांचा कल आहे. एकेका वॉर्डात अनेकजण इच्छुक आहेत. गेले काही वर्षे ते निवडणुकीची तयारी करत आहेत. मतदारांपर्यंत पोहोचण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. त्यामुळे एखाद्या पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास दुसर्‍या पक्षाकडे संबंधित इच्छुक जाण्याची भीती राजकीय पक्षांना आहे. परिणामी बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Back to top button