राज्यात अद्यापही 1417 कोटींची ‘एफआरपी’ थकीत | पुढारी

राज्यात अद्यापही 1417 कोटींची ‘एफआरपी’ थकीत

राशिवडे, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ऊस गळीत हंगाम संपून महिना उलटला असला तरी अद्यापही 1 हजार 417 कोटींची ‘एफआरपी’ रक्कम थकीतच राहिली आहे. 210 कारखान्यांपैकी 101 साखर कारखान्यांनी पूर्णपणे एफआरपी अदा केली आहे.

यंदाच्या ऊस गळीत हंगामामध्ये 210 साखर कारखान्यांनी भाग घेतला होता. या सर्व कारखान्यांनी हंगामामध्ये 1052 लाख मे. टन उसाचे गाळप केली. त्यानुसार एफआरपी प्रमाणे ऊस बिलापोटी 33278 कोटी रक्कम देय होती. त्यापैकी 31861 कोटी एफआरपी रक्कम अदा करण्यात आली; तर उर्वरित 1427 कोटीची एफआरपी अजून अदा करण्यात आलेली नाही.

राज्यातील 210 पैकी 101 कारखान्यांनी पूर्णपणे एफआरपी अदा केली आहे; तर 109 कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही. 80 कारखान्यांनी 80 ते 90 टक्के एफआरपी दिलेली आहे; तर 19 कारखान्यांनी 60 ते 79 टक्के एफआरपी दिलेली नाही. चालू हंगामातील अजूनही 1417 कोटीची एफआरपी अद्याप अदा करण्यात आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव खूप वाढले असूनसुद्धा एफआरपी थकीत आहे, हे विशेष. तसेच मागील गाळप हंगामात अनेक कारखान्यांनी बँकेचे पूर्व हंगामी कर्जाची उचल केली नाही. त्यामुळे कारखान्याला व्याजाचा भुर्दंड बसलेला नाही. परंतु अपेक्षित गाळप न झाल्यामुळे ऊस तोडणी मजूर यांचेकडे उचल शिल्लक राहिली आहे.

येत्या गाळप हंगामात म्हणजेच गाळप हंगाम 2023-24 ला एकूण गाळप क्षमतेएवढा ऊस मिळेल की नाही, ही शंका आहे. कारण उसाची वाढ मागील हंगामात अतिपावसाने कमी झाली आहे. त्यामुळे दर एकरी उत्पादन कमी मिळाले आहे. गाळप हंगाम 2023-24 साठी कारखान्याची वाढीव गाळप क्षमता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात उसाची गरज भासणार आहे. यासाठी कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे लागेल हे नक्की.

Back to top button