कोल्हापूर : मृत भ्रूणप्रकरणी ‘सीपीआर’ने हात झटकले; जबाबदार कोण? | पुढारी

कोल्हापूर : मृत भ्रूणप्रकरणी ‘सीपीआर’ने हात झटकले; जबाबदार कोण?

कोल्हापूर, दिलीप भिसे : एकेकाळी कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील गोरगरीब रुग्णांचे आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय परिसरात मनाचा थरकाप उडविणारी घटना नुकतीच चव्हाट्यावर आली. मृत भ्रुणांना फरफटत आणून मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याचे विदारक द़ृश्य अंगावर काटा आणणारे होते; मात्र या घटनेच्या गांभीर्यापेक्षा प्रशासनस्तरावर हात झटकून एकमेकांकडे अंगुली निर्देश करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

चार आणि सहा महिन्यांची स्त्री जातीचे दोन्ही मृत भू्रण शासकीय रुग्णालय परिसरात आली कोठून, याचा पोलखोल करण्याऐवजी ‘ते’ भू्रण शासकीय रुग्णालयातील नव्हेत, असा दावा करून जबाबदारी झटकून टाकण्याचा खटाटोप रुग्णालय प्रशासनाने केला आहे, याचेच आश्चर्य वाटते. मोकाट कुत्र्यांनी लचके तोडत आणलेली मृत दोन्हीही भ्रूण रुग्णालय परिसरात बाहेरून आणली आहेत की काय? यापेक्षा रुग्णालय आवारात ती आढळली आहेत, हे महत्त्वाचे आहे.

रुग्णालय प्रशासन आणि तपास यंत्रणा यांच्यात चौकशीचा घोळ सुरू असला, तरी तपासाच्या मुख्य केंद्रबिंदूपासून संबंधित यंत्रणा अजूनही चार हात दूरच आहे. गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्‍या सराईत टोळ्यांचे रॅकेट शहर, जिल्ह्यासह सीमाभागात कार्यरत आहे. शवविच्छेदन अहवालात दोन्हीही मृत भ्रूण स्त्री जातीचे असल्याचे निष्कर्ष आहेत. त्यामुळे या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. त्यात नक्कीच काळेबेरे असावे, अशी सार्वत्रिक भावना आहे.

‘नकोशी’चाच प्रकार; पण दुर्लक्षितपणा

शासकीय रुग्णालय आवारात मृत भ्रूण आढळल्याने उपचारासाठी दाखल एखाद्या महिला रुग्णाने कर्मचार्‍यांची नजर चुकवून भ्रूण कचरा कोंडाळ्यात टाकले असावे का, या धास्तीने प्रशासनाने तातडीने विशेष समिती नियुक्ती केली. चौकशीअंती दोन्हीही मृत भ्रूण सीपीआरमधील नसल्याचा निर्वाळा दिला असला, तरी हा ‘नकोशी’चा प्रकार तरी नसावा का, याचा समितीला छडा लावता आला नसता का?

बोगस डॉक्टर, एजंटांची जेल वारी!

कोल्हापूर येथील हरी ओमनगर, अंबाई टँक परिसर तसेच पन्हाळा तालुक्यातील पडळ येथे छापा टाकून दोन बोगस डॉक्टरसह साथीदारांना बेड्या ठोकल्या होता. दोन महिन्यांपूर्वी भुदरगडचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनीही गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदा गर्भपात करणार्‍या टोळीचा फर्दाफाश करून बोगस डॉक्टरसह बारा साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. ही मंडळी आजही कोठडीत दिवस मोजत आहेत.

केवळ कमाईसाठी गोरखधंदा !

विनासायास मिळणार्‍या पैशासाठी कोवळ्या कळ्या खुडण्याचा सराईत टोळ्यांचा उद्योग जोमात सुरू असतानाच शासकीय रुग्णालय आवारात दोन मृत भ्रृण आढळले आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य असतानाही आपसूक दुर्लक्ष करण्याचाच प्रयत्न होत असल्याची सार्वत्रिक चर्चा आहे.

पोलिस पथक केवळ नामधारी

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनीही घटनेच्या सखोल चौकशीसाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त केली. वास्तविक आठ-दहा दिवसांत काही ठोस माहिती हाती लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पथक केवळ नामधारी राहिले आहे.

बेकायदा गर्भपात करणार्‍या अनेक टोळ्या

अलीकडच्या काळात शहर, जिल्ह्यात गर्भलिंग निदान चाचणी आणि बेकायदा गर्भपात करण्याच्या अनेक घटना चव्हाट्यावर आलेल्या आहेत. पोलिस मुख्यालयातील कॉन्स्टेबल रूपाली यादव यांच्या सतर्कतेमुळे वर्षापूर्वी बेकायदा गर्भपात करणारी मोठी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या हाताला लागली होती. या टोळीचे अनेक कारनामे चव्हाट्यावर आले होते.

Back to top button