राजू शेट्टींनी राज्यातील शेतकर्‍यांना दिली हाक | पुढारी

राजू शेट्टींनी राज्यातील शेतकर्‍यांना दिली हाक

जयसिंगपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे पोलिसांनी जी दडपशाही केली आहे, त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्याठिकाणी आंदोलन करणार्‍या शेतकरी स्त्री-पुरुषांवर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड असा लाठीचार्ज केला आहे. जमीन द्यायची नाही, अशी भूमिपुत्रांची भूमिका असेल तर त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारणार असाल तर जरा तरी शरम पोलिसांना व आदेश देणार्‍या राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे. अशा पद्धतीने जर रत्नागिरीतील बारसूचे शेतकरी एकाकी आहेत म्हणून दडपशाहीचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढणार असाल तर आपण राज्यातील शेतकर्‍यांना हाक देत असल्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.
जयसिंगपूर येथे पत्रकारांना माहिती देताना शेट्टी पुढे म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगावमधील

प्रस्ताविक रिफायनरीच्या सर्वेक्षणावरून आंदोलन सुरू आहे. या प्रकल्पाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. असे असताना पोलिसांनी जी धडपशाही केली आहे. त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्याठिकाणी आंदोलन करणार्‍या शेतकरी स्त्री-पुरुषांच्यावर बेशुद्ध होईपर्यंत प्रचंड असा लाठीचार्ज केला आहे. मग मला कळत नाही की नेमक हे बारसू कोकणात आहे, महाराष्ट्रात आहे, की आणि कुठे आहे?

अशा पद्धतीच्या लोकशाहीच्या राज्यामध्ये मला धडपशाही सुरू असेल तर चला आपण रत्नागिरीला जाऊया आणि या बारसूच्या शेतकर्‍यांना वाचवूया. मग बघूया पोलिसांच्याकडे गोळ्या किती आहेत, लाट्या किती आहेत, पोलीस किती आहेत. या आंदोलनाला दोन हात करायचे असेल तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्याबरोबर दोन हात करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवावे आणि या शेतकर्‍यांबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठामपणे उभी आहे. त्यामुळे पोलिसांची व राज्यकर्त्यांची धडपशाही खपवून घेणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Back to top button