कोल्हापूर : शाहू समाधी स्थळ विकासासाठी 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर | पुढारी

कोल्हापूर : शाहू समाधी स्थळ विकासासाठी 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधी स्थळाच्या विकासासाठी नऊ कोटी 40 लाख 56 हजार रुपये सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेला निधी आता उपलब्ध होणार आहे. हा निधी देताना स्मारकाची जमीन सामाजिक न्याय विभागाच्या नावे करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

2013 पासून शाहू समाधी स्थळाच्या विकासाचे काम सुरू आहे. त्यावर महापालिकेने स्वनिधीतून पाच कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसर्‍या टप्यातील कामांसाठी नऊ कोटी रुपये 40 लाख 56 हजार रुपये राज्य शासनाने मंजूर केले होते. मात्र ही जागा सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्याची अट घालण्यात आली होती.

या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण, हॉलमध्ये आर्ट गॅलरी डॉक्युमेंटरी दाखविण्याची सोय, दलितमित्र दादासाहेब शिर्के उद्यान कपौंड वॉल लँडस्केपिंग, परिसरातील सात समाधी दुरुस्तीसह नूतनीकरण, पार्किंग सुविधा तसेच स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, हे काम जिल्हाधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

Back to top button