बंटी पाटील, तुम्ही शब्द मोडायला नको होता : आ. विनय कोरे | पुढारी

बंटी पाटील, तुम्ही शब्द मोडायला नको होता : आ. विनय कोरे

कोल्हापूर : विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यावेळी माझ्या घरात मी, ना. चंद्रकांत पाटील, उद्योगपती संजय पाटील आणि बंटी पाटील यांची बैठक झाली. त्या बैठकीत संजय पाटील आणि बंटी पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्यास आम्ही राजाराम कारखाना बिनविरोध करू, असा शब्द मला दिला होता; पण दुर्दैवाने बंटी पाटलांची शब्द फिरवण्याची वृत्ती समोर आली. त्यांनी विश्वासघात करून राजाराम कारखान्याची निवडणूक सभासदांवर लादली, असे प्रतिपादन जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते, आ. विनय कोरे यांनी केले.

सत्ताधारी सहकार आघाडीची विजय निर्धार सभा सोमवारी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात झाली. यावेळी ते बोलत होते. या सभेला खा. धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे चिरंजीव आदित्य पाटील-यड्रावकर, ‘जवाहर’चे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.

आ. विनय कोरे यांनी यावेळी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले, विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी पुढाकार घेतला होता. त्यानुसार मी माजी आमदार महादेवराव महाडिक आणि अमल महाडिक यांना विनंती केली आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देत विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध केली. बंटी पाटील आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले आणि नैतिकता विसरले. राजाराम कारखाना सभासद अपात्रता प्रकरणात त्यावेळी मी त्यांना त्यांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली होती, पण दुर्दैवाने बंटी पाटलांनी शब्द फिरवला, पण मी महाडिकांना दिलेला शब्द पाळणार आहे. त्यामुळे आज मी या व्यासपीठावर आहे.

माझ्यासोबत संपूर्ण वारणा परिवार, जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते सत्तारूढ सहकार आघाडीच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करतील. निवडणुका येतात-जातात, पण नैतिकता एकदा गेली की गेली, अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटील यांना सुनावले. खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांनी लादलेली ही निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. केवळ विरोधाला विरोध करण्याचे राजकारण करणार्‍यांनी आता पराभवाची तयारी ठेवावी, असा टोलाही महाडिक यांनी लगावला.

यावेळी कुंभोजच्या सरपंच जयश्री जाधव, माजी नगरसेवक जयंत पाटील, सत्यजित कदम, बाबासाहेब पाटील, अरुण पाटील, शंकरराव पाटील, उत्तम पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, दिलीप पाटील, सुरेश पाटील, भास्कर शेटे, राजकुमार भोसले, अनिकेत चौगुले यांच्यासह विविध मान्यवर, राजाराम कारखान्याचे सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button