महाडिकांच्या गाडीचे दरवाजे उघडणार्‍यांना घाबरण्याची गरज नाही : अमल महाडिक | पुढारी

महाडिकांच्या गाडीचे दरवाजे उघडणार्‍यांना घाबरण्याची गरज नाही : अमल महाडिक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गाडीचे दरवाजे उघडणार्‍या आ. सतेज पाटील यांना घाबरण्याची मला गरज नाही, असा पलटवार माजी आ. अमल महाडिक यांनी केला. महादेवराव महाडिक कसबा बावड्यात पाटील यांच्या घरी एकटेच गेले तेव्हा महाडिकांना बावड्यात फिरू न देण्याची वल्गना करणारे आ. पाटील बाहेरदेखील आले नाहीत. निदान अशा लोकांनी तरी महाडिक घाबरले, भ्याले असे म्हणू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाडिक यांच्यावर आरोप केले. त्याला अमल महाडिक यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले.

रडीचा डाव आम्ही खेळत नाही. आ. सतेज पाटील यांनी 1899 सभासद अपात्र ठरवून स्वत: रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. घाबरणारे तर मुळीच नाही. कोणाला घाबरावे? जे महादेवराव महाडिक यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होते त्यांना का घाबरावे? 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर त्यांना काळा दिवस आठवला, परंतु 1899 सभासद अपात्र ठरविताना त्यांना काही वाटले नाही.

सहकारामध्ये तोच खरा काळा दिवस होता. 1899 सभासद अपात्र ठरविले त्यावेळी आम्ही न्याय देवतेवर विश्वास ठेवून लढत राहिलो. त्यांच्यासारखे शासकीय यंत्रणेवर दबाव आणल्याचा किंवा अधिकार्‍यांना हाताशी धरण्याचा आरोप आम्ही करत बसलो नाही. आम्ही लढत राहिल्यामुळे यश मिळाले. निवडणुकीत 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने तेच आता घाबरले आहेत. पोट नियमांचा अभ्यास करून त्यांना हरकती घेण्यास कोणी अडविले नव्हते, असेही महाडिक म्हणाले.

शासकीय यंत्रणेवर दबाव आणल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. ते ही लोकप्रतिनिधी आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी माहिती घ्यावी. अधिकार्‍यांना विचारावे, असे सांगून महाडिक म्हणाले, महाविकास आघाडीच्या नावाखाली आ. पाटील यांनी राजाराम कारखान्याची निवडणूक पक्षीय पातळीवर नेली. गोकुळ, जिल्हा बँक, त्यांच्या संस्था अशी संपूर्ण यंत्रणाच निवडणुकीसाठी वापरत आहेत. सभासद हे कारखान्याचे मालक आहेत. गेली 27 वर्षे आम्ही सभासदांच्या दारात जातो. परंतु त्यांना आताच आम्ही दारात गेल्याचे दिसत असेल तर त्यात आमचा काय दोष?

राजाराम साखर कारखान्याच्या बाबतीत आ. पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो. आ. पाटील यांच्या डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याबाबतीत आम्ही तुलना केली तर त्यामध्ये काय गैर आहे? त्या कारखान्यातील कारभाराची तुलना करत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, असेही महाडिक म्हणाले.

यावेळी माजी चेअरमन दिलीप पाटील, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, डॉ. मारुती किडगावकर, दिलीप उलपे, प्रशांत तेलवेकर, किरण जाधव आदी उपस्थित होते.

Back to top button