राजाराम साखर कारखाना निवडणूक : अवैध 29 उमेदवारांचे अपील फेटाळले | पुढारी

राजाराम साखर कारखाना निवडणूक : अवैध 29 उमेदवारांचे अपील फेटाळले

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे दाखल केलेले अपील नामंजूर करण्यात आले आहे. याबाबत निकालाच्या प्रती रविवारी रात्री 12 वाजता कार्यालयीन कर्मचारी पाठवून संबंधितांना देण्यात आल्या.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या 29 उमेदवारांनी कारखान्याच्या कराराचा भंग केल्याच्या कारणाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 29 मार्च रोजी 29 उमेदवारांना अपात्र ठरवले होते.

या निर्णयाविरोधात संबंधितांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे 31 मार्च रोजी अपील दाखल केले होते. यावर 4 व 6 रोजी सुनावणी पूर्ण झाली. अपील दाखल झाल्या तारखेपासून दहा दिवसांत यावर निर्णय देणे बंधनकारक होते. याचे पालन करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी रविवारी (दि. 9) संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोच केल्या. पण त्या रात्री 12 वाजता. अशा पद्धतीने निकालाच्या प्रती रात्री बारा वाजता संबंधितांना देण्याची बहुदा ही जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील पहिलीच घटना असावी.
दि. 12 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. 13 रोजी चिन्हासह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. निर्णय विरोधात गेल्याने राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने यावर उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी आहे.

आजअखेर 33 उमेदवारांचे अर्ज मागे

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोमवारी 17 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आजअखेर 33 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मंगळवारी (दि. 12) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज गटनिहाय उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार असे : दिलीप रामचंद्र पाटील (उत्पादक गट क्र. 2), शरद दिनकर पाटील (उत्पादक गट क्र. 3), उदय हिंदुराव चव्हाण (उत्पादक गट क्र. 6), सूर्यकांत मनोहर पाटील, पांडुरंग सिद्धू बन्ने, यशवंत श्रीपती पाटील, शरद दिनकर पाटील (चारही इतर मागासवर्ग). जयश्री सूर्यकांत पाटील, मंगल पांडुरंग बन्ने, गीता दत्तात्रय मेडशिंगे, रूपाली शरद पाटील, सुनीता दिलीप पाटील, भारती संभाजी महाडिक, लक्ष्मीबाई मारुतराव मेडशिंगे (सातही महिला राखीव) जीवबा दत्तू कांबळे, धनाजी रामचंद्र सूर्यवंशी, राजकुमार बाजीराव चौगले (तिघे अनुसूचित जाती जमाती).

Back to top button