कोल्हापूर : नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) मधील करिअर संधीबाबत मार्गदर्शन | पुढारी

कोल्हापूर : नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) मधील करिअर संधीबाबत मार्गदर्शन

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  दै. ‘पुढारी’ आणि नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (NDA) मधील करिअर संधी’ या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. रविवार, दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे उपक्रम होणार आहे.

या कार्यशाळेत लेफ्ट. कर्नल समीर बोरस्कर (निवृत्त) आणि कमांडर सचिन जोग (निवृत्त) हे विद्यार्थ्यांना सैन्यात अधिकारी होण्यासाठी काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही सैन्य दलांत अधिकारी होण्यासाठी ‘एनडीए’मध्ये प्रवेश घ्यावा लागतो. ‘एनडीए’तील परीक्षेच्या माध्यमातून संरक्षण दलात उच्चपदस्थ अधिकारी होऊन देशसेवा करण्याची संधी मिळते. अत्यंत प्रतिष्ठित, आव्हानात्मक, गौरवास्पद करिअर म्हणून संरक्षण दलात जाण्याचे स्वप्न अनेकजण बघत असतात. त्यामुळेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या ‘एनडीए’ परीक्षेचे विशेष आकर्षण आहे. मात्र, अनेकांना या परीक्षेबाबत योग्य माहिती नसते, ती उणीव या मार्गदर्शनातून दूर होणार आहे. ‘एनडीए’मध्ये मुलांबरोबर मुलींनाही करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 10 वीनंतर, 11 वी, 12 वीपासूनच ‘एनडीए’ची तयारी कशी करावी, लेखी परीक्षेचे स्वरूप, एसएसबी, शारीरिक चाचणी, अभ्यासक्रम आणि त्याचे नियोजन, याची संपूर्ण माहिती या उपक्रमात देण्यात येणार आहे.

संरक्षण सेवेतील उच्च पदावर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलांना जाता यावे, हा संस्थेचा मानस आहे. ‘एनडीए’सोबतच भारतीय संरक्षण सेवा प्रवेशासाठीच्या इतर स्पर्धा परीक्षा, कंबाईन डिफेन्स सर्व्हिसेस आणि तांत्रिक विभागातील उच्च पदासांठी आवश्यक स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालक वर्गाला मिळणार आहे. मार्गदर्शन सत्रास विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके यांनी केले आहे.

Back to top button