शैक्षणिक धोरणाची 25 वर्षांची ब्ल्यू प्रिंट तयार करा : रमेश बैस | पुढारी

शैक्षणिक धोरणाची 25 वर्षांची ब्ल्यू प्रिंट तयार करा : रमेश बैस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण, बुद्धीचा विकास व स्वत:च्या पायावर उभे करण्यास हातभार लावणारे शिक्षण स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत होते. हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. नवीन शैक्षणिक धोरण सर्व विद्यापीठांमध्ये लागू झाल्यानंतर ऐतिहासिक बदल होईल. विद्यापीठांनी पुढील 25 वर्षांची शैक्षणिक धोरणाची ब्ल्यू प्रिंट तयार करून देश निर्माण कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले.

विद्यार्थ्यांनी ‘लाईफ लाँग लर्नर’ अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावे. काळानुरूप आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक प्रो. डॉ. संजय धांडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

शिवाजी विद्यापीठाचा 59 वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पद्धतीने बुधवारी राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात झाला. यावेळी राज्यपाल ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक महेश बंडगर व कुलपती सुवर्णपदक सोहम जगताप यांना प्रदान करण्यात आले. 16 पारितोषिके व 40 पीएच.डी. पदव्या देण्यात आल्या. राज्यपाल बैस म्हणाले, कोल्हापूर अंबाबाईचे पवित्र स्थान व राजर्षी शाहू महाराज यांचे संस्थान प्रगती व समाजहित कार्यासाठी देशात प्रसिद्ध आहे. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षात शिवाजी विद्यापीठाने त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सुरू केलेले संग्रहालय कौतुकास्पद आहे. या संग्रहापासून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल.
शिवाजी विद्यापीठाने हीरकमहोत्सवी वर्षात प्रगती केल्याचे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, 1962 मध्ये स्थापनेेवेळी शिवाजी विद्यापीठात 34 महाविद्यालये, पाच अधिविभाग, 14 हजार विद्यार्थी होते. विद्यापीठाचा आज मोठा शैक्षणिक विस्तार झाला असून, 40 अधिविभाग, 286 संलग्न महाविद्यालये व 2 लाख 50 हजार विद्यार्थीसंख्या आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी योगदान दिले आहे.

ज्ञान हीच संपत्ती असून, ज्ञान चोरले जाऊ शकत नाही. राजांकडून जप्त केले जात नाही, भावांमध्ये त्याची विभागणी होत नाही, ते सोबतही घेऊन जाऊ शकत नाही. ज्ञान जेवढे खर्च करू तेवढे ते वाढत जाते, त्यामुळेच ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. शिक्षण जीवनभर चालणारी प्रक्रिया असून, आयुष्यभर शिकणारा विद्यार्थी बनले पाहिजे. शिक्षित लोकांना प्रशिक्षण दिल्यास ते क्रांतिकारी परिवर्तन करू शकतात. दीक्षांत समारंभात दिलेल्या पारितोषिक व पदव्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. शिवाजी विद्यापीठ स्त्री सबलीकरणासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.

प्रो. धांडे म्हणाले, विद्यापीठाची पदवी स्वीकारल्यानंतर विद्यार्थी लाईफ लाँग लर्निंगच्या (थ—ी-एल) विद्यापीठात प्रवेश करणार आहेत. येथे कोणतीही परीक्षा किंवा गुण, प्रमाणपत्र, लेक्चर्स व प्रॅक्टिकल नाही. मात्र, या विद्यापीठातील विद्यार्थी अनुभवाने शिकत आहेत. कोरोनानंतर बदलाचा वेग वाढला आहे. काही कौशल्ये कालबाह्य होत असून, नवी कौशल्ये उदयास येत आहेत. त्यामुळे नवीन कौशल्ये आत्मसात करणे खरे शिक्षण आहे.

अनुभव जीवनातील महत्त्वाचा शिक्षक आहे. तुम्ही लाईफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी म्हणून अनुभव घेणार आहात. शिक्षण हे पूल मॉडेल असून, पूश मॉडेल नव्हे. दुर्दैवाने, पालक, मित्र व इतरांच्या दबावामुळे जे शिकायचे नाही, असे काही तरी शिकण्यास भाग पाडले जाते, अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. प्रत्येक तरुणामध्ये काही ना काही भूक नक्कीच असते. समाजाने ती भूक शमविण्यासाठी सहाय्यभूत व्हायला हवे. प्रश्नोत्तर संवाद हाच शिक्षणाचा पाया असून, त्यात सातत्य राहिले तरच त्यांचे कौशल्यात रूपांतर होईल, असे ते म्हणाले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा कौशल्य व मूल्ये या पैलूंवर भर असल्याचे सांगून प्रो. धांडे म्हणाले, लाईफ लाँग लर्निंग युनिव्हर्सिटीचे ते आधार आहेत. या मूल्यांची बीजे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत रुजविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे. बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम अवलंबितांना विद्यार्थ्यांना त्यांच्या विषय निवडीचे स्वातंत्र्य द्यायला हवे. तंत्रज्ञान बदलते व उच्चशिक्षणात घेतलेले चार वर्षांचे शिक्षण थिटे पडते. म्हणून बहु-विद्याशाखीय अभ्यासाची सवय लावून घेत निरंतर शिकत राहणे काळाची गरज आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यांनी गेल्या वर्षभरातील विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधकीय प्रगतीसह महत्त्वाचे निर्णय, राबविलेल्या विद्यार्थीभिमुख उपक्रमांचा आढावा घेतला. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील आणि सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांच्यासह विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

Back to top button