कोल्हापूर : गुडघे, खुब्याच्या शस्त्रक्रिया आता सीपीआरमध्ये मोफत | पुढारी

कोल्हापूर : गुडघे, खुब्याच्या शस्त्रक्रिया आता सीपीआरमध्ये मोफत

कोल्हापूर; डॅनियल काळे :  गोरगरिबांना वरदान ठरत असलेल्या सीपीआरमध्ये आता गुडघे आणि खुब्याच्या अवघड, गुंतागुंतीच्या आणि महागड्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. सीपीआरमध्ये आता मॉड्यूलर ओटी झाल्यामुळे या अवघड शस्त्रक्रियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी या शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णांना मुंबई, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी जावे लागत होते. आता मात्र सीपीआरमध्ये ही सोय झाल्याने संबंधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीतून येथे मॉड्यूलर ओपीडी तयार करण्यात आला आहे. त्याचा फायदा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी होणार आहे. सांधेरोपण, अवयव प्रत्यारोपण, कानाचे कॉक्लीअर इम्प्लांट यासारख्या शस्त्रक्रिया आता येथे होणार आहेत. मॉड्यूलर ओटीमुळे शस्त्रक्रियेनंतर जंतुसंसर्ग होण्याचा धोका कमी आहे. गुडघे, खुब्याच्या अवघड शस्त्रक्रिया करणे यापूर्वी सीपीआरमध्ये शक्य नव्हते. त्यासाठी मुंबई, पुणे किंवा सोलापूरला जावे लागत असत. आता ही सुविधा कोल्हापूरातच झाल्यामुळे रुग्णांचे पैसेही वाचणार आहेत. यापूर्वी खासगी रुग्णालयांतून या शस्त्रक्रियांसाठी जादाचे पैसे मोजावे लागत होते. हा खर्च कित्येक वेळा हजारात, लाखातही होत होता. जो सर्वसामान्य आणि गोरगरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे आता गोरगरीबांच्यासाठी ही एक चांगली सुविधाच निर्माण झाली आहे.

Back to top button