कोल्हापूर : ..अन्यथा अधिकार्‍यांना साडी-चोळी अन् बांगड्यांचा आहेर देऊ | पुढारी

कोल्हापूर : ..अन्यथा अधिकार्‍यांना साडी-चोळी अन् बांगड्यांचा आहेर देऊ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  येत्या 30 मार्चपर्यंत कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना साडी-चोळी अन् बांगड्यांचा आहेर करण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला.

शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात पाणीपुरवठा कार्यालयात गुरुवारी अधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. यावेळी पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये केवळ 1 कोटी रु. मंजूर केले आहेत. उर्वरित 3 कोटी रु. भीक मांगो आंदोलन करून महापालिकेला देण्यात येतील, असे महाविकास आघाडीच्या माजी पदाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्वच अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आले.

शहरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे, याबाबत वारंवार पाठपुरावा केला; तरीही त्यात फरक पडलेला नाही. महाविकास आघाडीच्या माजी पदाधिकार्‍यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक, छत्रपती शिवाजी मार्केट इथल्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात घेतली.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर भूपाल शेटे, महेश उत्तुरे, मधुकर रामाणे, राजाराम गायकवाड, माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच माजी पदाधिकारी, महिला तसेच नागरिकांनी पाणीपुरवठा विभागातील जल अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता प्रिया पाटील, अभिलाषा दळवी, शाखा अभियंता मिलिंद पाटील, मिलिंद जाधव, रावसाहेब चव्हाण यांच्यासह पंपिंग विभागातील जयेश जाधव यांना पाणी प्रश्नी धारेवर धरले. जय जाधव यांना निलंबित करावे, अशी मागणी सर्वांनी केली.

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी कोल्हापूरच्या जनतेला वेठीस धरले आहे. नियोजनबद्ध काम करण्यास जमत नसेल तर नोकर्‍या सोडा, असा दम यावेळी शारंगधर देशमुख यांनी दिला. नियोजित 23 लाख लिटर पाण्यापैकी 14 लाख लिटर पाणी कोल्हापूरवासीयांना मिळतंय, हे धादांत खोटे असून, नेमके किती पाणी कोणत्या प्रकारच्या नियोजनाने सोडले जाते, याचा खुलासा अधिकार्‍यांनी करावा, अशी मागणी सचिन चव्हाण यांनी केली.

Back to top button