सद्गुरू बाळूमामा : भावभक्तीची आख्यायिका…! | पुढारी

सद्गुरू बाळूमामा : भावभक्तीची आख्यायिका...!

मन प्रसन्न करणारी चैतन्यमूर्ती… भावभक्तीचे अलोट श्रद्धास्थान… दर्शनातून प्रत्यक्ष भेटीची अनुभूती… अन्नदानातून मिळणारी प्रसादरूपी तृप्तता… १८ कळपात पसरलेली ३२ हजार बकऱ्यांची पशुसेवा… आणि घराघरांत गेलेले नाम संकीर्तन याद्वारे महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू बाळूमामांच्या भक्तीचा सन्मार्ग दाखवणारे जीवितकार्य देवत्वाचा साक्षात्कार घडवणारे आहे.!

बाळूमामांची जन्मभूमी कर्नाटक; पण कर्मभूमी महाराष्ट्रात. अतिसामान्य धनगरी कुटुंबात ३ ऑक्टोबर १८९२ चा त्यांचा जन्म. ७४ वर्षांचे जीवित कार्य लाभलेल्या मामांचे आयुष्य चमत्कार आणि आख्यायिकांच्या रूपाने संजीवन झाले आहे. श्रीक्षेत्र आदमापूर येथे ४ सप्टेंबर १९६६ रोजी समाधीस्त झालेल्या मामांचे जीवित कार्य भक्ती आणि श्रद्धेच्या रूपाने घराघरांत पोहोचले आहे.

सीमाभागातील आजच्या कर्नाटक हद्दीत असलेल्या अक्कोळ गावात अत्यंत कष्टाचा खडतर जीवनक्रम असणाऱ्या धनगर कुटुंबात मामांचा जन्म झाला. बालपणात त्यांना ‘बाळाप्पा’ नावाने ओळखले जायचे. कलागुणी, एकांतप्रिय व विचित्र अवस्थेतील त्यांचे वागणे अनेकांना विस्मयकारक होते. लहान मुलातील दंगामस्ती आणि वात्रटपणा न आढळता गंभीर विचार अवस्थेमुळे आई-वडिलांना त्यांची चिंता लागली होती. त्यांना कामात गुंतवण्याच्या हेतूने गावातीलच चंदुलाल जैन शेठजीच्या घरी जनावरे राखण्यास ठेवले. बाळाप्पाला दिलेल्या जेवणाच्या थाळीत शेठजीच्या बायकोला जैन मंदिराचे दर्शन झाल्याने तिने ती थाळी देव्हाऱ्यात पूजली. छोट्या बाळाप्पाला हे रुचले नाही. त्याने हे काम सोडून दिले.

वीस वर्षे वयाच्या बाळाप्पापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवताच त्याने नकार दिला. अनिच्छेने बहिणीच्या सत्यवा नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. ‘आम्ही देवाचे चाकर असून प्रपंच भोग हा नश्वर आहे. या भूमिकेतून ते संसारी राहूनही त्यात गुंतले नाहीत.

पत्नीच्या घरातील इतर मुले लहान असल्याने ती बाळाप्पाला मामा म्हणू लागली. तेव्हापासून बाळाप्पाचा बाळूमामा झाला. नंतर ते स्वतंत्र मेंढपाळाचा व्यवसाय करू लागले. काटे-कुटे, ऊन-वारा, पाऊस याची पर्वा न करता सतत बकऱ्यांसोबत भटकू लागले. या भटकंतीत त्यांना वाचासिध्दी लाभली. आपल्या वाणीतून दिलेल्या उपदेशाने त्यांच्या आचरणाची ख्याती पसरू लागली.

बकऱ्यांसोबत रखरखत्या उन्हात भटकत असताना तहान भागवण्यासाठी एका खोलवर धोक्याच्या विहिरीत महाप्रयासाने ते उतरले. पाण्याने भरलेला तांब्या घेऊन विहिरीच्या काठावर येताच, दोन जटाधारी भगवी वस्त्रे परिधान केलेले बैरागी पाण्यासाठी याचना करू लागले. ज्यांचे परोपकारावाचून अन्य जीवन ध्येयच नसलेल्या त्या दोघांवर दया दाखवून त्यांची तहान भागवली. तृप्तीपोटी त्या बैराग्यांनी यापुढे तू जसे बोलशील तसे घडत जाईल, तू जे जे करण्याचे ठरवशील तेथे संपूर्ण यशस्वी होशील, असा आशीर्वाद दिला अन् घडतही गेले. तसेच सर्व मामांच्या चरित्र ग्रंथात आढळते.

मामांनी पूर्ण आयुष्य विविध चमत्कार व योग सामर्थ्याच्या बळावर खोट्याचा पर्दाफाश तर खऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. माणसाने माणसासारखं वागावं ही शिकवण देत सर्वसामान्य जणांचा ओढा भक्तिमार्गाकडे लावणे, सामाजिक संतुलन राखणे, अन्यायाला मूठमाती देणे, समाजातील अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना काळाच्या गरजेनुसार बदलण्याचे कार्य त्यांनी केले. आपल्या भक्तातील अंधश्रद्धा, दुष्टपणा आणि अविचारीपणा कधी शिव्या देत तर कधी धाकाच्या बळाने घालवून त्यांना सन्मार्गांना लावले. त्यामुळेच त्या काळात त्यांची प्रसिद्धी चौफेर पसरली.

पत्नी सत्यवा गरोदर असताना बकऱ्यांचा तळ कापशी मुक्कामी होता. त्यावेळी सोबत सासू गंगुबाई आणि सत्यवाला रिंगण आखून बाहेर न जाण्याची सक्त ताकीद देऊन बाळूमामा गाढ झोपी गेले. आज्ञा मोडून बाहेर जाणाऱ्या गरोदर सत्यवाचा गर्भपात झाला. या प्रसंगानंतर ते स्वत: च्या ससांरातून विरक्त झाले. नंतरच्या आपल्या एकट्याच्या भटकंतीत अनेक भक्तांना अनेक प्रसंगांतून सन्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न मामांनी केला. त्यांचे चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणारे अनेक भक्त हे चमत्कार शब्दबद्ध करून मामांच्या चरणी नतमस्तक होतात. तर आपल्या चिंता, दुःख व अडचणी मामांनी दूर कराव्यात, यासाठी लाखो भाविक त्यांच्या समाधीस्थळावर येतात.

बाळूमामा घराघरांत…

७४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाळूमामांना खरी प्रसिद्धी समाधी पश्चात मिळाली. मामांचे सान्निध्य लाभलेल्या अनेकांनी आपले अनुभव पुस्तक, ग्रंथ आणि ध्वनिफीतीच्या रूपाने समाजासमोर आणले. त्या आज आख्यायिका बनल्या आहेत. मामांच्या बकऱ्यांचा राज्यभरातील वावर, टी. व्ही. मालिका, चित्रपट आणि सोशल मीडिया यामुळे बाळूमामांची कीर्ती घराघरांत पोहोचली आहे.

बाळूमामांच्या मंदिरांची मांदियाळी…

अवघ्या एक तपाच्या कालावधीत मामांच्या कीर्तीचा महिमा सर्वदूर एवढा पसरला आहे की, दर अमावस्येला लाखो भाविक त्यांच्या समाधिस्थळावर माथा टेकतात. तर राज्यभरातून निघणाऱ्या शेकडो दिंड्या पताकांनी त्यावर भक्ती साज चढवला आहे. याच काळात महाराष्ट्र-कर्नाटकातल्या अनेक गावांत मामांच्या भक्तीची शेकडो श्रद्धामंदिरे उभी राहिली आहेत. मंदिरांची ही मांदियाळी अन्य ठिकाणी क्वचितच दिसून येते.

देवस्थान समिती व ग्रामस्थांनी वाढवला भक्तीचा महिमा

मामांच्या समाधी पश्चात श्रीक्षेत्र आदमापूर येथे बाळूमामा देवस्थान समितीने विविध उपक्रमांतून मामांचे काम सुरू ठेवले आहे. त्यास ग्रामस्थांनी मनोभावे व निःसार्थ साथ दिली आहे. गुढीपाडव्याला होणारा भंडारा उत्सव.. सप्टेंबरमध्ये होणारा पुण्यतिथी उत्सव…. ऑक्टोबरमध्ये होणारा मामांचा जन्मकाळ सोहळा आणि दीपावली पाडव्याला होणारे लेंडी पूजन हे चार मोठे धार्मिक उत्सव दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होतात. याशिवाय दर अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक मामांच्या दर्शनासाठी येतात. या सर्वांना आंबील प्रसाद, अन्नप्रसाद व भक्तनिवास या सोयी ग्रामस्थांच्या सहभागातून देवस्थान समिती पुरवते.
– डॉ. भीष्म सूर्यवंशी-पाटील, (मूरगूड)

Back to top button