कोल्हापूर : ‘बिद्री’ची निवडणूक प्रक्रिया जाहीर | पुढारी

कोल्हापूर : ‘बिद्री’ची निवडणूक प्रक्रिया जाहीर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी तयार करण्यासाठी संस्था प्रतिनिधींकडून गुरुवार (दि. 16) पासून ठराव सादर होणार आहेत. ठराव दाखल करण्याची मुदत दि. 17 एप्रिलपर्यंत आहे. यानंतर सभासद मतदारयादी तयार करण्यात येईल, त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे.

प्राथमिक मतदारयादी दि. 1 फेब्रुवारी 2023 या अर्हता दिनांकावर तयार करावयाची आहे. मतदारयादीमध्ये नाव समाविष्ट होण्यासाठी सहकारी संस्था सभासदास दि. 31 जानेवारी 2020 पूर्वी कारखान्याचे सभासद असणे आवश्यक आहे. संस्थेने संचालक मंडळाच्या बैठकीत ठराव मंजूर करावा, एका संस्थेने एकच ठराव मंजूर करावा, हे ठराव मार्केट यार्ड कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयात सादर करावयाचे आहेत. एकाच संस्थेने एकापेक्षा अधिक ठराव सादर करू नयेत, एकाच संस्थेचे दोन ठराव आल्यास संबंधित संस्थेचे सचिव व पदाधिकारी यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात येणार आहे.

या कारखान्याचे कार्यक्षेत्र कागल, भुदरगड, राधानगरी आणि करवीर या चार तालुक्यांचे असून, सुमारे 60 हजारांपेक्षा अधिक सभासद आहेत. गेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष के. पी. पाटील व आ. प्रकाश आबिटकर यांच्यात थेट सामना झाला होता. यावेळीदेखील कारखान्यात दुरंगी लढत असणार आहे. इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. कागल आणि राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय गट-तट ‘बिद्री’च्या निमित्ताने सक्रिय होत आहेत. या दोन्ही

मतदारसंघांतील मातब्बर नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Back to top button