कोल्हापूर : कर्नाटकातील कुख्यात टोळीला बेड्या | पुढारी

कोल्हापूर : कर्नाटकातील कुख्यात टोळीला बेड्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा व अन्य राज्यांत आलिशान बंगले फोडून किमती ऐवजांसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्‍या कर्नाटकातील आंतरराज्य टोळीचा म्होरक्या राजू सल्वराज तंगराज (वय 37, रा. कारगल, जि. शिमोगा) याच्यासह साथीदारांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 46.5 तोळे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू असा 24 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी शहरासह उपनगरातील 14 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

या टोळीने ऑगस्ट ते डिसेंबर या काळात आर. के. नगर, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव याठिकाणी भाड्याच्या खोलीत वास्तव्य करून स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने गंभीर गुन्हे केले आहेत. टोळीतील आणखी दोन सराईत पसार आहेत. त्यांच्या अटकेनंतर जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांचा छडा लागणे शक्य असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलवकडे यांनी सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषणसह लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई

अटक केलेल्या राजू तंगराज, भीमगोंडा मारुती पाटील (29, रा. हलकर्णी, ता. गडहिग्लज) या दोघांकडून 35.5 तोळे सोन्याचे दागिने व श्रीकृष्ण ऊर्फ अमोल संजय अलुगडे (27, रा. भाटशिरगाव, ता. शिराळा, सांगली) याच्याकडून 11 तोळे दागिने जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण व लक्ष्मीपुरी पोलिसांनी कारवाई केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

टोळीकडून 14 गुन्ह्यांची कबुली

या टोळीने करवीर पोलिस ठाण्यांतर्गत 2, गांधीनगर 5, गोकुळ शिरगाव 6 तसेच श्रीकृष्ण अलुगडे याने एक अशा 14 गुन्ह्यांची कबुली दिल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

टोळीच्या हालचालीवर करडी नजर

मोरेवाडी (ता. करवीर) येथील निखिलेश सासमिले यांचा बंगला फोडून चोरट्याने किमती मुद्देमाल लंपास केला होता. पाठोपाठ होणार्‍या चोरी, घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी विशेष पथकांची नियुक्ती केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक विनायक सपाटे, विनायक चौगुले, प्रकाश पाटीलसह पथकातील कर्मचार्‍यांची संशयितांवर नजर होती.

Back to top button