कोल्हापूर : शिवरायांच्या मूळ लघू व्यक्तिचित्रांचा खजिना ग्रंथ रूपात | पुढारी

कोल्हापूर : शिवरायांच्या मूळ लघू व्यक्तिचित्रांचा खजिना ग्रंथ रूपात

कोल्हापूर, प्रवीण मस्के : युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या मूळ लघू व्यक्तिचित्रांचा अस्सल खजिना पुस्तकाच्या रूपाने येत आहे. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा असे हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणार आहे. हॉलंडमध्ये वास्तव्यास असलेले भास्कर हांडे यांच्या 20 वर्षांच्या अविरत प्रयत्नातून संशोधनाचे हे अस्सल स्वरूप साकारले आहे. छत्रपती शिवरायांच्या समकालीन चित्रकारांनी साकारलेल्या या चित्रांच्या संशोधनाचे हे सार लवकरच प्रकाशित होत आहे.

चित्रकार व शिल्पकार हांडे मूळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर (उंब्रज) मधील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कवी, चित्रकार, शिल्पकार म्हणून परिचित आहेत. हॉलंड येथे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले होते. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्याकडे एका संशोधकास विद्यार्थ्यास माहिती घेण्यासंदर्भात पाठविण्याची विनंती केल्याचे हांडे यांनी सांगितले. त्यावेळी डॉ. मोरे यांनी तुम्हीच याबाबत संशोधन करा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ चित्रांविषयी कुतूहल निर्माण होऊन माहिती चित्र संकलित करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तिचित्र संशोधन’ ग्रंथ आकारास येण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रांचा तुलनात्मक अभ्यास करून संशोधन करण्यात आले आहे. ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची पाश्चिमात्य चित्रकारांची 17 व्या शतकात रेखाटलेली 19 लघू व्यक्तिचित्रे आहेत. शिवरायांची वेशभूषा, अलंकार व शस्त्रांची ठेवण यांचा सूक्ष्म अभ्यास करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडण्याचा हांडे यांनी प्रयत्न केला आहे. या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिचित्रांचे अनेक बारकावे पुराव्यासह टिपले आहेत. हांडे यांनी युरोपासह अनेक देशांतील वस्तुसंग्रहालयामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध शैलीतील अनेक व्यक्तिचित्रांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या संशोधनामुळे परदेशातील छत्रपतींची मूळ लघुव्यक्ती चित्रे एकत्र पाहण्याची संधी शिवप्रेमी, संशोधकांना मिळणार आहे.

ग्रंथात उत्तर व दक्षिणेकडील मुघल, कुतुबशहा, निजामशहा, आदिलशहा यांच्या 50 चित्रांचा संग्रह तत्कालीन हॉलंडच्या व्यापार्‍याने तेथील महापौर यांच्याकडे दिला. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्राचा 46 वा क्रमांक आहे. 2007 पासून ती हॉलंडच्या रॉयल म्युझियममध्ये आहेत. तसेच विजापूर दरबारातील 1675 चे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णाकृती चित्र प्रमाणित चित्र असल्याचे हांडे यांनी सांगितले.

1933 नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूळ व्यक्तिचित्रांचा शोध कोणीच घेतलेला नाही. या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराज मूळ लघू व्यक्तिचित्रे इ. स. 1700 पूर्वीची 19 चित्रे आहेत. त्यामधील चार चित्रांची ग्रंथात चिकित्सा केली आहे. उर्वरित चित्रे ही खराब चुकीची नक्कल आहेत. ग्रंथाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच शिवाजी विद्यापीठ छत्रपती संभाजी महाराज केंद्रातर्फे प्रकाशित होईल.
– भास्कर हांडे, चित्रकार-शिल्पकार

Back to top button