कोल्हापूर : मार्केट यार्ड-शिवाजी पूल उड्डाण पुलांचे डीपीआर तयार करा | पुढारी

कोल्हापूर : मार्केट यार्ड-शिवाजी पूल उड्डाण पुलांचे डीपीआर तयार करा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या आदेशानुसार मार्केट यार्ड ते शिवाजी पूल या मार्गावरील तिन्ही उड्डाण पुलांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने तयार करा, अशी सूचना माजी आमदार अमल महाडिक यांनी महापालिका अधिकार्‍यांना दिली.

शहरातील वाहतुकीवर ताण कमी करण्यासाठी बास्केट ब्रिजसह मार्केट यार्ड ते शिवाजी पूल या मार्गावर उड्डाण पुलांसाठी निधी देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात दिली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेत महाडिक यांनी बैठक घेतली.

शहरातील रस्त्यांची आणि उड्डाण पुलांच्या सर्वेक्षणासाठी 22 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका अधिकार्‍यांनी संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अमल महाडिक म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी शहरातील वाहतुकीवर ताण कमी करण्यासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे तातडीने या कामास सुरुवात करावी. तावडेपासून शिरोली जकात नाका येथेपर्यंत बास्केट ब्रिज होणार आहे. त्यामुळे मार्केट यार्ड-कावळा नाका, कावळा नाका-दाभोळकर कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर-दसरा चौक आणि दसरा चौक-शिवाजी पूल असे चार उड्डाण पुलांचे डीपीआर तातडीने तयार करावेत. शिये ते कसबा बावडा या मार्गावर महापुराचे पाणी येत असल्याने या परिसरात तीनशे मीटर अंतराचा उड्डाण पुलाचा डीपीआर बनवावा. या उड्डाण पुलामुळे शियेतून कोल्हापुरात येणारा मार्ग महापुरातही सुरू राहण्यास मदत होणार आहे.

जाधववाडी ते कसबा बावडा आणि कसबा बावडा-पंचगंगा घाट या शंभर फुटी रस्त्याबाबतही सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा, अशी सूचना महाडिक यांनी केली. याबरोबरच शिये, कसबा बावडा, ताराराणी चौक, टेंबलाई उड्डाण पूल, शिवाजी विद्यापीठ उजळाईवाडी या जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे सर्वेक्षण करून आवश्यक ती माहिती तयार करण्यास महाडिक यांनी सांगितले. तसेच पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर महापुराचे पाणी येऊ नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यास सांगण्यात आले.

बैठकीस महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, एनएचआयचे प्रकल्प अधिकारी वसंत पंदरकर, सी. बी. भराडे, सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मुधाळे, उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

Back to top button