कोल्हापूर : अंबाबाईच्या रथाचे वजन झाले कमी | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाईच्या रथाचे वजन झाले कमी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथाचे वजन सुमारे 300 किलोंनी कमी झाले आहे. नवा रथ आता 1400 किलो वजनाचा असेल, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रथावर डोम बसविण्याचे काम अंबाबाई मंदिर परिसरात शनिवारपासून सुरू करण्यात आले. रथसप्तमीच्या मुहूर्तावर डोमचे पूजन देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते झाले.

सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षे सुस्थितीत राहील असा नवा रथ संपूर्ण सागवानी लाकडात बनविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 12 लाख रुपयांचे सागवान वापरण्यात आले असून, रथात कोठेही खिळ्यांचा वापर केलेला नाही. लाकडी खुण्या आणि पारंपरिक अडक करून संपूर्ण रथाची बांधणी केली आहे. नव्या रथाचा डोम हा संपूर्ण सागवानी लाकडाचाच केला आहे. अत्यंत सुबक पद्धतीने अडकेचा वापर करत हा डोम पूर्णपणे एकसंध बनवला आहे. रथावरील चांदीची कलाकुसरही आता हव्या त्या वेळेला रथावर घालता येणार आहे.
नेरूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील विलास मेस्त्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शाम मेस्त्री, संतोष मेस्त्री, महेश मेस्त्री, समीर गावडे, प्रथमेश सुतार, किरण नेरूरकर आणि प्रकाश सुतार या कारागिरांनी रथ साकारला आहे. यापूर्वीच्या रथाचा आकार, उंची कायम ठेवण्यात आली आहे.

रथाची सध्याची बाभळीच्या लाकडाची असणारी चाके बदलण्यात येणार आहेत. नवी चाके सागवानी असतील आणि त्यांची उंचीही थोडी अधिक राहणार आहे. यापूर्वीच्या रथाचा डोम फायबरचा होता. तसेच लोखंडी पट्ट्यांमुळे रथाचे वजनही अधिक होते. नव्या रथाचे वजन सुमारे 300 किलोंनी कमी होणार आहे.

टेंबलाई मंदिर परिसरात म्युझियम

अंबाबाईचा जुना रथ टेंबलाई मंदिर परिसरात ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी म्युझियम सुरू करण्याचा विचार आहे. तेथे हा रथ, अंबाबाईची जुनी तोफ, घाटी दरवाजावरील जुनी घंटा आदी ठेवण्यात येणार असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.

Back to top button