कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 कोटी वाढीव निधी द्या : दीपक केसरकर | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यासाठी 302 कोटी वाढीव निधी द्या : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्याला मिळणारा अपुरा निधी, वाढता पाऊस आणि वारंवार येणार्‍या महापुराने जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता जिल्हा वार्षिक योजनेच्या 389 कोटी 36 लाखांच्या आराखड्यासह वाढीव 302 कोटी रुपयांचा वाढीव निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी राज्यस्तरीय नियोजन समितीच्या बैठकीत केली.

केसरकर म्हणाले, जिल्ह्यात बारा तालुके असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे. कोल्हापूर महापालिकेसह नवनिर्माण इचलकरंजी महापालिकेसोबत 13 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेत 302 कोटींचा वाढीव निधी द्यावा. वाढीव निधीतून सामान्य शिक्षणासाठी 40 कोटी, व्यवसाय तंत्र उच्च शिक्षणासाठी 12 कोटी 50 लाख, पर्यटनासाठी 29 कोटी, आरोग्य सेवेसाठी 64 कोटी 33 लाख, नगरविकाससाठी 56 कोटी, रस्ते विकासासाठी 20 कोटी, ग्राम विकाससाठी 17 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील कुस्तीची परंपरा जपण्यासाठी जुन्या व ऐतिहासिक तालमींच्या संवर्धन व सक्षमीकरणासाठी 8 कोटी 50 लाखांच्या विशेष निधीची मागणी केसरकर यांनी केली. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामग्रीकरिता तसेच नावीन्यपूर्ण योजनेतून शेतीसाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रशिक्षण व सुविधा केंद्र उभारण्यासाठी 4 कोटी व हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, प्रसार व सुविधा केंद्राकरिता 100 कोटी निधीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 सर्वसाधारणअंतर्गत 425 कोटींची तरतूद मंजूर असल्याचे सांगून सन 2023-24 साठीचा 389 कोटी 36 लाखांचा सर्वसाधारण प्रारूप आराखडा वित्तीय मर्यादेनुसार तयार केल्याचे सांगितले. वाढीव मागणीनुसार गाभा क्षेत्रातील कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, पाटबंधारे व पूर नियंत्रण, सामाजिक व सामूहिक सेवा यासाठी एकूण 213 कोटी 8 लाख रुपयांचा, तर बिगर गाभा क्षेत्रातील ऊर्जा, उद्योग व खाणकाम, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा आणि सामान्य सेवा यासाठी 89 कोटी 68 लाखांच्या अतिरिक्त निधीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार धनंजय महाडिक यांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीला अतिरिक्त निधी देण्याची मागणी केली. आमदार प्रकाश आवाडे यांनी नव्याने निर्माण झालेल्या इचलकरंजी महापालिकेसाठी भरीव तरतूद करण्याची मागणी केली.

बैठकीसाठी पालकमंत्री केसरकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते, तर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल रेखावार, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांच्यासह अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

389 कोटी 36 लाख रुपयांचा आराखडा

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण प्रारूप आराखडा सन 2023-24 या वर्षांसाठी राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधरणचा 2023-24 या वर्षाचा शासन वित्तीय मर्यादेनुसार तयार केलेला 389 कोटी 36 लाख रुपयांचा आराखडा सादर केला.

शाळांच्या दुरुस्तीसाठी निधीआवश्यक

जिल्ह्यात 200 हून अधिक शाळांना 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेकडील नवीन 533 वर्गखोल्या बांधकाम व 2 हजार 69 प्राथमिक शाळा खोल्या नादुरुस्त आहेत. त्यांच्या दुरुस्तीकरिता तसेच 224 नवीन शाळा स्वच्छतागृह बांधकाम व 263 शाळा स्वच्छतागृहांची दुरुस्ती, 349 शाळांना संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे आवश्यक असल्याने जादा निधी मंजूर होणे आवश्यक आहे.

Back to top button