कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणातील संशयितांची पोलिसांकडून बडदास्त? | पुढारी

कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणातील संशयितांची पोलिसांकडून बडदास्त?

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर गर्भलिंग निदानप्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधारासह सात संशयितांची भुदरगड पोलिसांनी चांगलीच बडदास्त ठेवल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून, पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यास आणखी काही धागेदोरे मिळण्यास वेळ लागणार नाही.

बेकायदेशीर गर्भलिंग निदानप्रकरणी मडिलगे खुर्द येथील विजय लक्ष्मण कोळस्कर यास गर्भलिंग निदान चाचणी करताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्याकडे गर्भलिंग निदान चाचणीसाठी गिर्‍हाईक पाठविणार्‍या बामणी येथील डॉ. बाबुराव दत्तू पाटील, सोनाळी येथील सागर शिवाजी बचाटे, राधानगरी येथील दिगंबर मारुती किल्लेदार, नर्स शीला शामराव माने, सर्जेराव अशोक पाटील, हातकणंगले तालुक्यातील रुई येथील अमोल सुर्वे या एजंटांना अटक झाली होती.

अटकेनंतर न्यायालयाने या सर्वांना पोलिस कोठडी सुनावली होती. यावेळी नातेवाईक या संशयितांना भेटून त्यांच्याशी बिनधास्त बोलत होते. त्यांच्यासाठी आणलेला खाऊ, जेवण पुरविले जात होते. या सर्वांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्याच मांडला होता. अटकेच्या कालावधीत पोलिसांनी या सातजणांची बडदास्त ठेवली होती. त्यामुळे नातेवाईकांसह संशयित पोलिसांच्या मेहरबानीवर चांगलेच खूश दिसत होते.

संशयितांना न्यायालयीन कोठडीसाठी कोल्हापूरकडे रवाना करताना केलेला टाटा, बाय-बाय याची सत्यता पडताळायची झाल्यास पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तपासल्यास पोलिसांचे पितळ उघडे पडेल. संशयितांच्या नातेवाईकांसह त्यांना मदत करणार्‍या पंटरांसह पोलिसांच्या हालचालीही वरिष्ठांच्या नजरेस पडतील. पोलिस अधीक्षकांनी गेल्या आठ दिवसांतील पोलिस ठाण्याच्या आवारातील सीसीव्ही फुटेजची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button