कोल्‍हापूर : सरूड बायपासवर ट्रॅक्‍टरचा अपघात; सल्ला धुडकावला अन् जीवाला मुकला | पुढारी

कोल्‍हापूर : सरूड बायपासवर ट्रॅक्‍टरचा अपघात; सल्ला धुडकावला अन् जीवाला मुकला

सरुड ; पुढारी वृत्तसेवा सरुड (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीत सागांवकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटून झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप हिरामण पवार (वय ३५, रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्याकडे तो ऊसाची वाहतूक करीत होता. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलेली अपघाताची घटना आज (बुधवार) पहाटे उघडकीस आली.

स्थानिक पोलिस पाटील दीपाली घोलप यांनी शाहूवाडी पोलिसांना या अपघाताची वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जेसीबीच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅक्टरखालून चालकाचा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत चालक दिलीप पवार हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये ऊस भरून विश्वास साखर कारखान्याकडे काल (मंगळवार) रात्री निघाला होता. यावेळी सरुड गावाच्या पूर्वेकडील किसनगिरी मठ परिसरात रस्त्याच्याकडेला ऊसाच्या ट्रेलर्स उलटल्या. यानंतर चालकाने अपघातग्रस्त ट्रेलर्स त्याच स्थितीत सोडून ट्रॅक्टर घेऊन पुन्हा बायपासवरून भरधाव वेगाने माघारी निघाला होता. यावेळी साधारण अर्ध्या किलोमीटर अंतरावर हा ट्रॅक्टर रस्त्याकडेच्या विजेच्या खांबावर आदळून लगतच्या शेतात घुसला. या जोराच्या धडकेत ट्रॅक्टरचा छत अडकून विजेचा सिमेंटचा खांब मोडून पडला होता.

दरम्यान, मद्यधुंद चालकाने अपघातग्रस्त ट्रॅक्टर खोल शेतातून बाहेर काढण्यासाठी बांधावरून ट्रॅक्टर चढविण्याचा केलेला प्रयत्न फसला. म्हणून पुन्हा दिशा बदलून ट्रॅक्टर वेगात बायपास रस्त्यावर चढविण्याच्या प्रयत्नात चालक ट्रॅक्टर मागे उलटल्याने स्टेअरिंगखाली सापडून जागीच ठार झाला.

सल्ला धुडकावला अन् चालक जीवाला मुकला 

दरम्यान, घटनास्थळावरील वीटभट्टीवरील कामगारांनी संबंधित चालकाला ट्रॅक्टर शेताबाहेर काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वाहनाने सकाळी ट्रॅक्टर बाहेर काढता येईल, तोपर्यंत विश्रांती घेण्याचा त्याला सल्ला दिला. मात्र मद्यधुंद चालकाने त्यांचे काही एक ऐकले नाही आणि काही क्षणात ट्रॅक्टरचा अपघात होऊन हा दुर्दैवी चालक आपल्या जीवाला मुकला.

हेही वाचा : 

Back to top button