कागल : हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आक्रमक कार्यकर्त्यांकडून रास्तारोको (VIDEO) | पुढारी

कागल : हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आक्रमक कार्यकर्त्यांकडून रास्तारोको (VIDEO)

कसबा सांगाव (कागल) : पुढारी वृत्तसेवा – कसबा सांगाव (ता.कागल ) येथे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे पडल्याची बातमी धडकली तसे कार्यकर्ते कसबा सांगाव बाजार पेठेत जमले. आक्रमक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून भारतीय जनता पक्षाचा निषेध केला. केवळ राजकीय द्वेषातून ही कारवाई केली जात आहे. अल्पसंख्यांक समाजातील असून सुद्धा आमदार मुश्रीफ यांनी जनतेच्या सेवेतून मिळवलेली लोकप्रियता भाजप नेत्यांच्या डोळ्यात खूपत आहे.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप होऊन सुद्धा त्याची चौकशी होत नाही. मात्र केवळ राजकीय त्रास देण्यासाठी आमदार मुश्रीफ यांच्यावर धाड टाकली जात आहे. याचा जाहीर निषेध कार्यकर्त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तालुका संघाचे संचालक राजेंद्र माने, माजी सरपंच रणजीत कांबळे, अजित शेटे, संजय हेगडे, किरण पास्ते, ग्रा. पं. सदस्य अमर कांबळे, सुरेश लोखंडे, अब्दुल रशीद मुल्ला, मारुती पाटील, विक्रमसिंह माने, दस्तगीर मुल्ला, किरण घुले, पी. डी. आवळे, अमोल आंबी, काशीम मुल्ला आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते संघटितपणे कागल येथील आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानाकडे गेले.

Back to top button