कोल्हापूर : आजर्‍यात विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : आजर्‍यात विराट हिंदू जनआक्रोश मोर्चा

आजरा, पुढारी वृत्तसेवा : देशात हिंदूंची संख्या कमी होत असून, हे चिंताजनक आहे. हिंदू धर्म टिकला नाही, तर देशाचे तुकडे होतील. त्यामुळे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एकीची वज्रमूठ महत्त्वाची असल्याचे हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी म्हटले आहे.

शुक्रवारी आजरा येथील हिंदू जनआक्रोश मोर्चावेळी ते बोलत होते. लव्ह जिहाद, गोहत्याबंदी, धर्मांतरविरोधी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

स्नेहसंमेलनावरून परतणार्‍या अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जनआक्रोश मोर्चाची हाक दिली होती. शुक्रवारी सकाळपासून शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने मोर्चासाठी पंचायत समितीसमोर आलेे. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

दुर्गापूजन, ध्वजपूजन, जनआक्रोश ज्योतीचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आला. आजरा अर्बन बँकेसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

हा आक्रोश मोर्चा नसून, जनादेश मोर्चा आहे. हिंदू हिताला बाधा आणणार्‍या गोष्टींना पायबंद घालण्यासाठी कायदे करण्याची मागणी आम्ही करीत आहोत. या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हिंदूंनी जागरूक झाले पाहिजे. या मोर्चामुळे हिंदू जागृतीसाठी आजर्‍याची नवी ओळख निर्माण झाल्याचे एकबोटे म्हणाले.

हिंदू जनजागृती समितीच्या सदस्या अ‍ॅड. राजश्री तिवारी यांनी लव्ह जिहाद हे मोठे धर्मयुद्ध असून, त्याला आमच्या तरुणी फसत आहेत. मुलींना धर्मशिक्षण देण्याची गरज आहे. पाश्चात्त्य संस्कृतीला घरात थारा येऊ देऊ नका. हिंदूं राष्ट्रासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

यावेळी सहव्यासची गुरुकुलमचे लखन जाधव, हिंदू एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची भाषणे झाली. हिंदू जनजागृती संघटनेचे सदस्य आदित्य शास्त्री, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष बंडा साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अभिषेक रोडगे यांनी स्वागत केले. नाथ देसाई यांनी प्रास्ताविक केले. वामन सामंत यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर कुंभार यांनी आभार मानले. शिवानी काणेकर यांनी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र सादर केला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राजीव नवले, तहसीलदार विकास अहिर, सपोनि सुनील हारूगडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

छत्रपती संंभाजीराजे धर्मवीरच!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेत एकबोटे यांनी त्यांच्यावर टीका केली. आकाशात चंद्र-सूर्य असेपर्यंत छत्रपती संभाजीराजे धर्मवीर असतील, असे सांंगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही राष्ट्रद्रोेही काँग्रेस असल्याचे सांगितले.

Back to top button