कोल्हापूर : धरण साठ्यात दहा टक्के घट
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात दहा टक्के घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील ही स्थिती आहे. यामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नसली तरी मान्सून लांबला तर जूनमध्ये स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात 3 जानेवारी 2022 रोजी राधानगरी, काळम्मावाडी, वारणा आणि तुळशी या मोठ्या धरणांसह आठ प्रकल्पात 64.12 टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी याच दिवशी या आठ प्रकल्पांत 57.9 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणी साठ्यात दहा टक्क्यांनी घट झाली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी मान्सूनने सरासरी गाठलीच नाही. तरीही पावसाळ्यात सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली. चांगला पाऊस झाला नाही. त्यानंतर परतीचा पाऊसही फार काळ झाला नाही. तरीही शेतीसाठी धरणातून गतवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस उशिराच पाणी सोडण्यात आले. मात्र, गेल्यावर्षी सोडलेल्या पाण्याच्या तुलनेत यावर्षी 3 जानेवारीपर्यंत अधिक पाण्याची गरज भासली आहे.
सध्या शेतीसाठी तुळशी, वारणा, दूधगंगा, कडवी, कुंभी आणि पाटगाव या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरी आणि कासारी धरणातून सध्या विसर्ग सुरू नाही. राधानगरी धरणातून यापूर्वी विसर्ग सुरू होता. आतापर्यंत राधानगरीतून 170 एमसीएफटी पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा सध्या तरी चिंताजनक नसला तरी वळीव आणि मान्सून वेळेवर सुरू झाला नाही तर हा पाणीसाठा काळजी करणारा ठरणार आहे. यावर्षी उन्हाळा तीव्र राहिला तर पाण्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सहा धरण क्षेत्रातच झाला चांगला पाऊस
जिल्ह्यात गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. सरासरीच्या 23.48 टक्के कमीच पाऊस झाला. गेल्या 18 वर्षांतील कमी पावसाचे हे तिसरे वर्ष ठरले आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या चार महिन्यांत सरासरी 1733.1 मि.मी.पाऊस होतो. गतवर्षी तो 1326.2 मि.मी.इतकाच झाला आहे. यामुळे जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 76.52 टक्केच पाऊस झाला. प्रमुख 15 पैकी सहा धरण क्षेत्रातच 2021 च्या तुलनेत यंदा जादा पाऊस झाला. मात्र तो तुलनेने अधिक नव्हता. लघू पाटबंधारे प्रकल्पांचीही स्थिती सारखीच आहे. त्याचा पाणीसाठाही यावर्षी कमीच आहे.
जिल्ह्यातील स्थिती (दि. 3 जानेवारीपर्यंत)
धरण गतवर्षीचा पाणीसाठा यावर्षीचा पाणीसाठा
राधानगरी 6.67 6.54
तुळशी 3.01 2.86
वारणा 23.52 23.44
दूधगंगा 20.44 15.12
कासारी 2.57 2.17
कडवी 2.19 2.23
कुंभी 2.57 2.35
पाटगाव 3.45 3.19