कोल्हापुरात अवतरले भगवे वादळ | पुढारी

कोल्हापुरात अवतरले भगवे वादळ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्येचे वाढते प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक कायदा करावा, या मागण्यांसाठी सकल हिदू समाजाने रविवारी कोल्हापुरात विराट मोर्चा काढला. हजारो कार्यकर्ते भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या टोप्या आणि भगवे स्कार्प परिधान करून ‘जय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवाजी,जय भवानी’चा जयघोष करत मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे कोल्हापुरात अक्षरश: भगवे वादळच अवतरले होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे गट) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदींसह विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाची तयारी सुरू होती. ठिकठिकाणी फलक लावून, तसेच जनजागृती करून लोकांचे संघटन करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे रविवारी सकाळी 11 वाजताच बिंदू चौक गर्दीने भरून गेला. ठिकठिकाणाहून तरुण, तरुणी आणि नागरिक मोर्चासाठी बिंदू चौकात येत होते. याठिकाणी खासदार धनंजय महाडिक, महेश जाधव, संभाजी साळुंखे, माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, शिवसेनेचे संजय पवार, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, भगवान काटे, राहुल चिकोडे आदी याठिकाणी उपस्थित होते.

बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर भगव्या ध्वजाचे पूजन करून मोर्चाला सुरुवात झाली. भगवा ध्वजासह छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे आणि भारत मातेची प्रतिमा घेऊन उभे असलेले धारकरी मोर्चाच्या अग्रभागी होते. त्यांनतर महिला कार्यकर्ते आणि पुरुष अशा शिस्तबद्धतेने मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी चौकातील भव्य फलक आणि शिवरायांचा जयघोष

छत्रपती शिवाजी चौकामध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने गर्व से नही घमंडसे कहो हम हिंदू है. असा भला मोठा फलक लावला होता. त्यावर छत्रपती शिवरायांचा फोटो होतो. या फलकासमोर थांबून तरुणांनी प्रचंड घोषणाबाजी केली. येथे असणार्‍या छत्रपती शिवरायांच्या फोटोला पुष्पहार घालून अनेकांनी अभिवादन केले. या भव्य फलकासमोर थांबून तरुणांचे गट सेल्फी घेतहोते. त्यामुळे मोर्चा शिवाजी चौकातच बराच काळ रेंगाळला. प्रचंड घोषणाबाजी करत कार्यकर्ते येथे बराच काळ थांबून होते.

जिहादियो सावधान, जाग रहा है हिंदुस्थान

लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि गोहत्या रोखण्यासंदर्भात कायदा करण्यासाठी हा मोर्चा होता. त्यामुळे फलक घेऊन तरुण, तरुणी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. जिहादियो सावधान, जाग रहा है हिंदुस्थान… असा आशय लिहिलेल्या या फलकासह सर्वच फलक लक्षवेधी होते.

शस्त्रसज्ज पथक

या मोर्चामध्ये मुली आणि मुलांचे एक शस्त्रसज्ज पथकही तैनात केले होते. हातात तलवारी, भाले आणि त्रिशूल, लाठ्या असणारे एक पथक मोर्चात सहभागी झाले होते. लव्ह जिहादविरोधात तरुणांनी आक्रमक घोषणाबाजी केली. ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक मोर्चा पाहत उभे होते.

मोर्चा मार्गावर ठिकठिकाणी पाणी, न्याहरी वाटप

मोर्चातील सहभागी झालेल्यांना पाणी देण्यासाठी ठिकठिकाणी मोफत पाणी वाटपाचे स्टॉल उभे केले होते. काही ठिकाणी न्याहरीची व्यवस्थाही केली होती.

कडक पोलिस बंदोबस्त

मोर्चाच्या मार्गावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. तसेच वॉच टॉवरही उभे केले होते. बिंदू चौकात जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

पापाची तिकटी येथील बॅरिकेडिंग कार्यकर्त्यांनी हटविल्याने तणाव

बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडवरून घोषणाबाजी करत मोर्चा पापाची तिकटीला पोहोचला. येथे पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून मोर्चा माळकर तिकटीच्या दिशेने न जाऊ देता तो चप्पल लाईनकडे वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु कार्यकर्त्यांनी त्याला विरोध करत मोर्चा माळकर तिकटीकडेच नेण्याचा आग्रह धरत बॅरिकेडिंग काढून टाकली. या मार्गावर मरकज मशीद असल्याने पोलिसांनी ही काळजी घेतली होती; परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यावेळी कार्यकर्ते जय श्रीरामचा नारा देत होते. पोलिस एका बाजूला थांबून हे पाहत होते. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्याही घोषणा दिल्या.

हिंदू समाजाच्या मागण्यांचा विचार होईल : खा. महाडिक

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून होणार्‍या हिंदू मुलींच्या फसवणुकीविरोधात हिंदू समाज एकवटला आहे. लव्ह जिहाद, गोहत्या विरोधी कायदे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रात व राज्यात हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कायदे होतील. काही पक्ष या मोर्चात सहभागी झाले नाहीत, त्यांना भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया खा. धनंजय महाडिक यांनी मोर्चावेळी दिली.

Back to top button