कोल्हापूर : 115 कोटींच्या रस्ते प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी | पुढारी

कोल्हापूर : 115 कोटींच्या रस्ते प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 115 कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी त्यासाठी पाठपुरावा केला, अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांची नव्याने बांधणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने यापूर्वी 265 कोटींचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवला होता. शासनाकडून दोन टप्प्यांत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 115 कोटींचा प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर केला होता. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत हा प्रस्ताव आहे. यात कोल्हापूर शहरातील 81 प्रभागांपैकी 35 प्रभागांतील 18 मोठे रस्ते, गटार, फुटपाथ आदी कामांचा समावेश आहे.

दसरा चौक ते बिंदू चौक, खासबाग, मिरजकर तिकटी, नंगीवली चौक, इंदिरा सागर हॉटेल चौक, प्रभाग क्र. 69 समाधान हॉटेल ते आयटीआय कॉर्नर, लक्षतीर्थ चौक ते निगवेकर गोडावून, आण्णासो शिंदे स्कूल, राजारामपुरी माऊली चौक ते हुतात्मा चौक ते गोखले कॉलेज चौक, कन्हैया सर्व्हिसिंग सेंटर ते जिश्वजित हॉल, निर्मिती कॉर्नर ते कळंबा जेल, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, शाहू सेना चौक ते झूम एसटीपी प्रकल्प, अनुग्रह हॉटेल ते नष्टे पुतळा, संघवी बंगला, डॉ. एम. विश्वेश्वरय्या हॉल ते चंदवाणी हॉल, हॉटेल रसिका ते जाधववाडी रिंगरोड, अ‍ॅपल हॉस्पिटल ते झेडपी कंपाऊंड, गोल्ड जिम ते सदर बाजार चौक, लक्ष्मीपुरी वाणिज्य वसाहत, जैन मंदिर, पानलाईन ते धान्य बाजार, वृषाली आयर्लंड ते पर्ल हॉटेल, न्यू शाहूपुरी, प्रभाग क्र. 78 निर्माण चौक ते जरगनगर शेवटचा बस स्टॉप, प्रभाग क्र. 47 खरी कॉर्नर ते गांधी मैदान चौक, निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, स्टेशन रोड ते सायबा हॉटेल, महावीर कॉलेज चौक, फुलेवाडी मेन रोड ते पहिला बस स्टॉप ते सहावा बस स्टॉप, ते चौथा बस स्टॉप, गणेश मंदिर ते शेळके कॉलनी रोड आदी रस्त्यांचा प्रस्तावात समावेश आहे.

फेब्रुवारीत कामाच्या निविदा : सरनोबत

सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याने महापालिकेच्या वतीने मुंबईतील नगर परिषद संचनालय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दोन दिवसांत सादर केला जाणार आहे. तेथून हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे जाईल. अंतिम मंजुरीनंतर निधी वर्ग होईल. साधारणतः फेब्रुवारी 2023 मध्ये रस्ते कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील. त्यानंतर वर्कऑर्डर देऊन तत्काळ कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून लवकर निधीसाठी प्रयत्न करू : क्षीरसागर

कोल्हापुरातील रस्त्यांचा 2017 पासून प्रश्न प्रलंबित आहे. 2022 मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात बैठक झाली होती. त्याचवेळी 100 कोटींच्या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली होती. आता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत कोल्हापुरातील रस्त्यांच्या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आताचा 115 कोटींचा प्रस्ताव मंजूर करून घेऊ. त्यानंतर लवकरच रस्त्यासाठी महापालिकेकडे निधी वर्ग होईल, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button