गायरानमधील अतिक्रमण काढल्यास रक्तपात : आ. हसन मुश्रीफ | पुढारी

गायरानमधील अतिक्रमण काढल्यास रक्तपात : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गायरानमधील अतिक्रमण काढल्यास रक्तपात होईल, असे आ. हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्ह्यातील केवळ अकरा कोटी रुपये विकासकामांवर खर्च झाला आहे. वेळेत खर्च झाला नाही तर निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यास पालकमंत्र्यांना वेळ कधी मिळणार, असा सवालही त्यांनी व्यक्त केला

न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने गायरानमधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी मागणी आम्ही गेल्या काही दिवसांपासून करत आहोत. परंतु, त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. हे योग्य नाही. गायरानमधील अतिक्रमण काढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच आहे; पण रक्तपात देखील होईल, असेही मुश्रीफ म्हणाले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक अद्याप न झाल्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत केवळ 11 कोटी रुपये खर्च झाले आहेत. नियोजन समितीची बैठक न झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्व विकासकामे ठप्प आहेत. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीची बैठक का घेत नाहीत? निधी परत जाण्याची ते वाट पाहात आहेत काय? असा सवालही त्यांनी केला. जिल्ह्यातील थांबलेली विकासकामे सुरू करण्याकरिता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक तातडीने घ्यावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.

शिंदे गटाला चिन्ह न मिळाल्याने निवडणुका लांबणीवर?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला अद्याप निवडणूक चिन्ह मिळाले नसल्यामुळे कदाचित नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका सरकार घेण्यास टाळत असावे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्याचे प्रभाग किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे मतदारसंघ सन 2011 च्या जनगणनेवर आधारित तयार करण्यात आले आहेत. त्यानंतर जनगणना झालेली नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेली लोकसंख्या वाढ गृहीत महानगरपालिका प्रभाग व जिल्हा परिषदेच्या मतदारसंघाची पुनर्रचना केली होती. परंतु, या सरकारने ती रद्द केली.

लोकसभेसाठी व्ही. बी. पाटीलही इच्छुक

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. अलीकडेच चेतन नरके यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. अरुण नरके यांचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे ते भेटू शकतात. उद्योजक व्ही. बी. पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

ए.वाय. आज आमच्या सोबत आहेत ना?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लावलेली हजेरी चर्चेचा विषय बनली होती. यासंदर्भात मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी ए. वाय. पाटील आज आमच्यासोबत दिसतात ना? ते आमच्यासोबत आहेत म्हणजे राष्ट्रवादीतच आहेत, असे सांगितले.

Back to top button