कोल्हापूर : खराब रस्त्यांमुळे गुदमरतोय कोल्हापूरचा श्वास | पुढारी

कोल्हापूर : खराब रस्त्यांमुळे गुदमरतोय कोल्हापूरचा श्वास

कोल्हापूर, आशिष शिंदे : कोल्हापुरातील सुमारे सोळा लाख वाहनांमधून निघणार्‍या धुरापेक्षाही रस्त्यांवरून पसरणार्‍या अतिसूक्ष्म धूलिकणांमुळे (पर्टिक्युलेट मॅटर) अधिक प्रदूषण होत असल्याचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे. शहरातील सुमारे 800 किलोमीटर रस्त्यांची अवस्था सुधारल्यास हे प्रदूषण कमी होईल, अशी सूचनाही अहवालात करण्यात आली होती. मात्र शहरातील रस्त्यांची अवस्था सुधारण्याऐवजी वाईटातून वाईटाकडे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांचा श्वास गुदमरत आहे.

शहरातील रस्त्यांची अवस्था अशीच राहिल्यास सध्या जाणवणारे श्वसनाचे आजार अधिक गंभीर होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या तरी धुळीचे शरीरावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी अनेक नागरिक मास्कचा आधार घेत आहेत.

वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशातील 102 प्रदूषित शहरांमध्ये कोल्हापूरचा समावेश झाला आहे. शहरातील प्रदूषणकारी घटकांमध्ये खराब रस्त्यांचा वाटा तब्बल 22 टक्क्यांचा आहे. कोल्हापुरातील हवेमध्ये वाहनांमधून सर्वाधिक अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पर्टिक्युलेट मॅटर) उत्सर्जन होते. यानंतर खराब रस्त्यांचा नंबर लागतो. हे अतिसूक्ष्म धूलिकण शरीरासाठी सर्वाधिक घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार सांगितले आहे.

उद्दिष्टपूर्ती सोडा, प्रदूषणात भरच

वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला होता. यामध्ये शहरातील रस्त्यांची अवस्था 2018 च्या तुलनेत 100 टक्के सुधारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीत रस्त्यांची अवस्था पाहता ही 2018 च्या तुलनेत तर अधिकच बिघडली आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक

मनपा प्रशासनाकडून पॅचवर्क करताना सक्शन मशिनऐवजी ब्लोअर मशिन वापरले जाते. रस्त्याचे पॅचवर्क करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. सिग्नलला वाहनचालक थांबलेले असताना कर्मचार्‍यांकडून ब्लोअरचा वापर केला जातो. यामुळे धुळीचे लोटच्या लोट हवेत पसरतात. अशा प्रकारच्या कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रोड स्वीपिंग मशिन गायब

काही वर्षांपूर्वी रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी व रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी रात्री रोड स्वीपिंग मशिन फिरताना दिसत होत्या. यामुळे अतिसूक्ष्म धूलिकणांच्या पातळीमध्ये काही प्रमाणात का होईना, पण घट झाली होती. मात्र आता हे रोड स्वीपिंग मशिन गायब झाल्याने रस्त्यावरील धुळीचे प्रमाण वाढले आहे.

Back to top button