शंभर वर्षांनंतरही ‘राधानगरी’च्या स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान अचंबित करणारे | पुढारी

शंभर वर्षांनंतरही ‘राधानगरी’च्या स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान अचंबित करणारे

कोल्हापूर ; सागर यादव : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची दूरद़ृष्टी आणि कल्पकतेतून साकारलेल्या भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजांचे तंत्रज्ञान 100 वर्षांनंतरही देशातील तमाम अभियंत्यांना अचंबित करणारे आहे. महान अभियंते आणि नवभारताचे निर्माते भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांनी या स्वयंचलित दरवाजांची रचना केली होती. त्यांच्या स्मृतींची आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची साक्ष हे धरण आजही देत आहे.

अभियंता दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांच्या कल्पकतेतून शंभर वर्षांपूर्वी साकारलेल्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचे
स्थापत्यशास्त्र जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली दशात ग्वाल्हेर, म्हैसूरसह खडकवासला आणि राधानगरी धरणावर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित पाणी सोडण्याची व्यवस्था आणि पाण्याच्या दबावावर उघड-झाप होणार्‍या स्वयंचलित दरवाजांचे वैशिष्ट्य असणारे राधानगरी धरण देशातील अजोड आणि एकमेव आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीने उभारण्यात आलेले राधानगरी धरण आज 100 वर्षांनंतरही जलसिंचन आणि जलविद्युत निर्मितीचे कार्य अखंडपणे करत आहे. यामुळेच हे धरण कोल्हापूर जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरले आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर कोल्हापुरात धरण बांधण्याचा निर्धार केला. 100 वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्?नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. कोल्हापूरचे भाग्यविधाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रयतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली. कोल्हापूर जिल्ह्याला समृद्ध बनविण्यासाठी राधानगरी धरण बांधले. राजर्षी शाहूंच्या दूरद़ृष्टीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याची कामगिरी त्यावेळचे अभियंता दाजीराव अमृत विचारे यांनी केली.

हे धरण राजर्षी शाहूंचे जीवन ध्येय

राधानगरी धरण हे आपल्या जीवनाचे ध्येय असल्याचे राजर्षी शाहूंनी वारंवार आपल्या लिखाणातून आणि बोलण्यातून सांगितले होते. यामुळे तन-मन-धन लावून त्यांनी हे काम पूर्ण केले. फेब्रुवारी 1908 मध्ये धरण परिसरातील फेजिवडे गावात राधानगरी ही नवी पेठ वसवून महालाचे ठाणे सुरू केले. 1 मार्च 1908 रोजी राधानगरी महालाच्या प्रशासकीय कामांची सुरुवात झाली. 23 नोव्हेंबर 1908 रोजी प्रारंभी 3 लाखांचा निधी मंजूर केला होता. धरणासंदर्भात त्यांनी तज्ज्ञ व्यक्तींशी सातत्याने विचारविनिमय ठेवला.

मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड लिमिंग्टन, पोलिटिकल खात्यातील सर आर्चिबाल्ड हंटर, कोल्हापूर संस्थानचे माजी पोलिटिकल एजंट लेफ्टनंट कर्नल डब्ल्यू. बी. फेरीस, सर डब्ल्यू. टी. मॉरिसन, मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड सिडनहॅम, मुंबई सरकारचे प्रमुख इंजिनिअर ए. हिल अशा अनेकांशी पत्रव्यवहार केले. इतकेच नव्हे तर यातील अनेकांना प्रत्यक्ष धरण क्षेत्राची पाहणी करण्यासाठीही पाचारण केले होते.

योजना तयार करणार्‍या विचारे यांना इनाम जमीन

22 सप्टेंबर 1908 रोजी राधानगरी धरणाच्या योजनेस राजर्षी शाहू महाराज यांनी मंजुरी देऊन त्याच वर्षीच्या दसर्‍याच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. योजनेचे शिल्पकार इंजिनिअर रावसो दाजीराव अमृतराव विचारे (एल.सी.ई.एम.एल.सी. कोल्हापूर स्टेट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर) होते.

कोल्हापूर शहरापासून 35 मैल अंतरावर राधानगरी गावाच्या पुढे भोगावती नदीचा प्रवाह अडवून हे अद्भुत धरण बांधले आहे. बांधकाम सुरू असताना स्वत: शाहू महाराज चौपाईवर घोंगडे टाकून बसून प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष द्यायचे. इतकेच नव्हे तर मजुरांसोबत भाकरी-तुकडा खाऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचे.

महाराजांचे धाकटे बंधू पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब घाटगे, चिटणीस नेरुरकर, कृष्णा भोसले, नाना भोसले, नारायण जाधव, शंकर भोसले, कृष्णा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो हात धरण उभारणीच्या कामात गुंतले होते. राधानगरी धरणाची योजना तयार केल्याबद्दल आणि सरकारी नोकरी इमानेएतबारे केल्याबद्दल दाजीराव विचारे यांना कसबा करवीरमध्ये राजर्षी शाहूंनी जमीन इनाम दिली होती (10 मे 1911 चा ठराव).

सर विश्वेश्वरय्या यांचेही मार्गदर्शन

इसवी सन 1909 मध्ये धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. निधीची कमतरता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा अनेक अडचणींवर मात करीत सन 1918 पर्यंत 14 लाख रुपये खर्चून धरणाचे बांधकाम 40 फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे आणि राजर्षी शाहूंच्या निधनामुळे (1922) काही काळ रखडले. मात्र छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत धरणाचे अपुरे काम पुन्हा हाती घेतले.

भारतीय अभियंत्रिकी सेवेतील दिग्गज व अनुभवी इंजिनिअर पांडुरंगराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे पुढील काम सुरू झाले. याच काळात जागतिक कीर्तीचे वास्तुशास्त्रज्ञ सर विश्वेश्वरय्या यांना पाहणी व मार्गदर्शनासाठी बोलवून घेतले (सन 1941). छत्रपती राजाराम महाराज यांच्या अकाली निधनानंतर काही काळ काम पुन्हा रखडले.

पुढे छत्रपती शहाजी महाराजांच्या काळात धरणाच्या कामाला गती आली. 1949 ते 55 या काळात 245 लाख खर्च करून धरणाची उंची 126 फुटांपर्यंत वाढविण्यात आली. यात 8362 दशलक्ष घनफूट पाणी साठविण्याची क्षमता निर्माण झाली. यासाठी रिजन्सी कौन्सिलचे सुधारणा सचिव डॉ. जे. पी. नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. सन 1957 ला धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले.

Back to top button