कोल्हापूर : रेशन दुकानांत नागरिकांना ‘वाय-फाय’ सुविधा मिळणार | पुढारी

कोल्हापूर : रेशन दुकानांत नागरिकांना ‘वाय-फाय’ सुविधा मिळणार

कोल्हापूर; अनिल देशमुख :  ग्रामीण भागात नागरिक विशेषत: विद्यार्थ्यांना घराजवळ इंटरनेटची सविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यात ‘पीएम-वाणी’ योजना राबविली जाणार आहे. या योजनेद्वारे रेशनधान्य दुकानांतून वाय-फाय इंटरनेट सुविधा दिली जाणार आहे. दुकानांच्या 200 मीटर परिघापर्यंत अल्पदरात नागरिकांना वाय-फाय इंटरनेट मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह पुणे, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पालघर आणि सोलापूर या सात जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशात इंटरनेटचा वापर वाढत असला, तरी ग्रामीण व शहरी विभाजन अजूनही कायम आहे. ग्रामीण भागात ग्राहकांची संख्या जास्त आहे. तेथील इंटरनेट घनता शहरी भागातील इंटरनेटच्या घनतेच्या फक्त एकतृतीयांश आहे. डिजिटल इंडियानंतर आता वाय-फाय क्रांती केली जात आहे. यामुळे इंटरनेट ही आता अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.

ग्रामीण, दुर्गम भागातील नागरिकांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता केंद्र शासनाने ‘पीएम-वाणी’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सार्वजनिक डेटा केंद्रे सुरू केली जाणार असून, त्याद्वारे परिसरात वाय-फाय इंटरनेट उपलब्ध करून दिले जाणार आहे. सार्वजनिक डेटा केंद्र म्हणून रास्तभाव धान्य दुकानांना मान्यता देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन, उत्तर प्रदेशातील दहा जिल्हे, उत्तराखंडमधील डेहराडून, आंध— प्रदेशातील कर्नूल येथील धान्य दुकानांत या योजनेची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील सात जिल्ह्यांत ही योजना सुरू केली जाणार असून, अन्य जिल्ह्यांतील दुकानदार इच्छुक असतील, तर तिथेही पहिल्या टप्प्यातच ही योजना सुरू केली जाईल, असेही राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल चॅनेलही होणार

या योजनेच्या माध्यमातून सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल चॅनेल सुरू केले जाणार आहे.

या योजनेने काय होईल?

  • सार्वजनिक ठिकाणी परवडणार्‍या दरात वाय-फाय इंटरनेट मिळेल. ऑनलाईन शिक्षणाला मदत होईल.
  • ग्रामीण भागात तसेच जेथे इंटरनेट सुविधा कमी अथवा नगण्य आहे तिथे ही सुविधा उपलब्ध होईल.
  • वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील लोकांचेही उत्पन्न वाढेल, जीवनशैली सुधारेल, रोजगार वाढेल.

निर्णय स्वागतार्ह : मोरे

या निर्णयामुळे दुर्गम, ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, विक्रेते आदी सर्वांनाच दररोज एक ते दीड जीबी डेटा मिळणार आहे. त्याकरिता महिन्याभरासाठी 99 रुपये खर्च येणार आहे. यामुळे याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. रेशनधान्य दुकानदारांनाही त्याचा मोठा फायदा होईल, असे जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

Back to top button