कोल्हापूर : 215 साखर कारखान्यांनी मागितला परवाना | पुढारी

कोल्हापूर : 215 साखर कारखान्यांनी मागितला परवाना

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  राज्यात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याची चिन्हे असताना, गाळप करणार्‍या
कारखान्यांच्या संख्येचाही विक्रम प्रस्थापित होईल, असे चित्र आहे. राज्यात यंदा तब्बल 215 कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला असून, आतापावेतो 165 कारखान्यांना साखर आयुक्तालयाने परवाना दिला आहे.
काही कारखान्यांच्या गाळप परवान्याचा प्रश्न साखर आयुक्तालयाच्या विचाराधीन असून, त्यावर निर्णय झाल्यावर अंतिम चित्र स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात गेल्या हंगामात 205 साखर कारखान्यांनी गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडे अनुमती मागितली होती.
यंदा त्यात आणखी 10 साखर कारखान्यांची भर पडली आहे. यंदा परवानगी मागणार्‍या कारखान्यांपैकी 16 कारखाने गेल्या हंगामात बंद होते. त्यांनी चालू हंगामासाठी परवाना मागितला आहे. या 16 पैकी 10 सहकारी
आणि सहा खासगी कारखाने आहेत. हे कारखाने अहमदनगर, सोलापूर व औरंगाबाद विभागातील आहेत. यंदा या भागात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यातील बहुतेक कारखाने खासगी प्रवर्तकांनी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतले आहेत.

साखर आयुक्तालयाने यंदा परवानाविषयक धोरण कडक केले आहे. परवान्याशिवाय गाळप करणार्‍या कारखान्यांना त्यांनी गाळप केलेल्या उसाला प्रतिटन 500 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. याशिवाय ज्या कारखान्यांनी गतहंगामात उत्पादकांची बिले चुकती केलेली नाहीत, त्यांचे परवाने रोखून धरण्यात आले आहेत.

कारखाने आणि परवाने

गाळप परवाना मिळालेले कारखाने 165
सहकारी कारखाने 84
खासगी कारखाने 81
गाळप सुरू झालेले कारखाने 93
सहकारी कारखाने 46
खासगी कारखाने 47

Back to top button