जठारवाडी येथील मृतांचे वारस, जखमींची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस | पुढारी

जठारवाडी येथील मृतांचे वारस, जखमींची मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : जुनोनी (सांगोला) येथे वारकर्‍यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात जठारवाडी येथील पाचजणांचा मृत्यू झाला. या मृतांच्या वारसांच्या व जखमींच्या घरी जाऊन विचारपूस केली. तसेच जखमींच्या नातेवाईकांना तातडीने मदत करण्याचे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले .

मंत्री पाटील यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले की, जठारवाडी येथील हे वारकरी एका रस्त्याच्या कडेने जात होते. या रस्त्याचे काम सुरू असताना त्यातच कारचालक नवखा होता. त्यामुळे हा अपघात झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेे आहे.

यावेळी अपघातातील मृत शारदा घोडके, रंजना जाधव, सर्जेराव जाधव, सुनीता काटे, शांताबाई जाधव यांच्या वारसांचे सांत्वन केले, तर जखमींच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. त्यांना शासकीय मदतीसह आपण वैयक्तिक मदत करणार असल्याचे सांगितले. सोलापूर, कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार घेणार्‍या जखमींच्या नातेवाईकांचे आर्थिक हाल होत असल्याचे गावकर्‍यांनी सांगितल्यावर ना. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करून नातेवाईकांना खर्चासाठी आर्थिक मदत करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले.

यावेळी माजी आ. अमल महाडिक, राहुल चिकोडे, वीरेंद्र मंडलिक, गटविकास अधिकारी जाधव, जठारवाडीचे सरपंच नंदकुमार खाडे, ग्रामसेवक आनंद द्रविड, भाजप तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील, चिटणीस निखिल पाटील, मारुती बुवा, शिरोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button