विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा जल्लोष | पुढारी

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा जल्लोष

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘रूबाबदार भगवे फेटे, पांढर्‍या रंगाचे टी-शर्ट, काळ्या रंगाच्या ट्रॅकपँट अशी वेशभूषा केलेल्या मुली, फुटबॉल टीम्सच्या नावांचा जयघोष आणि टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव करत कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्याचा आनंद लुटला. मैदानात कोल्हापूकरांनी केलेल्या नादखुळा जल्लोषाने मैदान अक्षरश: दणाणले होते. या फुटबॉलप्रेमींच्या उत्साहामुळे खेळाडूही भारावले. त्यांनी कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींसोबत आवर्जून सेल्फी काढले.

जागतिक फुटबॉल संघटनेमार्फत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या वतीने ‘फिफा’ 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या संयोजनाचा मान यंदा भारताला मिळाला होता. स्पर्धेतील अंतिम सामना कोलंबिया विरुद्ध स्पेन यांच्यात रविवारी रात्री आठ ते दहा या वेळेत मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला. हा सामना पाहण्यासाठी कोल्हापुरातील 150 मुलींसह 225 फुटबॉलप्रेमींनी उपस्थिती लावली होती. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य तथा स्पर्धेचे मुख्य समन्वयक मालोजीराजे व महिला सदस्या सौ. मधुरिमाराजे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ही संधी कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींना मिळाली.

भारतीय फुटबॉलला चालना व योग्य दिशा या स्पर्धेच्या आयोजनातून मिळणार आहे. संपूर्ण जगातील चांगल्या खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्षपणे पाहण्याची संधी नवोदित फुटबॉलपटूंना मिळावी तसेच कोल्हापुरातील उदयोन्मुख महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. खेळाडू व फुटबॉलप्रेमींसोबत कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे (केएसए) पेट्रन-इन-चीफ शाहू महाराज, अध्यक्ष मालोजीराजे, सौ. मधुरिमाराजे, सचिव माणिक मंडलिक, विश्वास कांबळे, नंदकुमार बामणे, क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, बाजीराव देसाई आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

उपक्रमात छत्रपती शाहू विद्यालय, उषाराजे हायस्कूल, भाई माधवराव बागल हायस्कूल, काडसिद्धेश्वर हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल या शाळांतील महिला फुटबॉलपटूंसह सोलापूर येथील खेळाडूंचाही समावेश होता. राजेंद्र दळवी, भाऊ घोडके, दिग्विजय मळगे, रघू पाटील, अमित शिंत्रे, अमर पोवार, अमित साळोखे, संजय चिले, निखिल सावंत, नीलेश मुळे व सहकार्‍यांनी संयोजन केले.

Back to top button