कोल्हापूर : नद्या होणार अमृतवाहिन्या | पुढारी

कोल्हापूर : नद्या होणार अमृतवाहिन्या

कोल्हापूर, अनिल देशमुख : राज्यातील नद्या अमृतवाहिन्या होणार आहेत. याकरिता आता राज्य शासनाने ‘चला जाणूया नदीला’ अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत नदी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणार्‍या कृष्णा, पंचगंगा आणि कडवी नदीसह राज्यातील 103 नद्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांतील पावसाची अनियमितता, यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. वाढते औद्योगिकीकरण, नागरिकीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढत चालला आहे. त्या तुलनेत पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. नद्या तसेच धरणे, तलावातील वाढत्या गाळामुळे पाण्याची वहन क्षमता आणि साठवण क्षमता कमी होत चालली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नदीला जाणून घेऊन, तिच्या समस्यांचा अभ्यास व्हावा, त्याद्वारे या समस्यांवर उपाय शोधून या प्रश्नांची कायमस्वरूपी सोडवणूक व्हावी, त्यातून जलस्रोत वाढावे याकरीता ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून या नद्यांसाठी समन्वयकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणार्‍या कृष्णा नदीसाठी उदय गायकवाड आणि नितीन डोईफोडे, पंचगंगेसाठी संदीप चोडणकर तर कडवीसाठी राजेंद्र लाड आणि अजिंक्य बेर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अभियानातर्गंत नदी संवाद, जनसामान्यांना नदीबाबत साक्षर करण्यासाठी विविध उपाय योजना, नदीचा सर्वंकष अभ्यास, त्याद्वारे अमृत वाहिनीसाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार आणि प्रसार रुपरेषा तयार करणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधता याबाबत प्रचार, प्रसाराचे नियोजन, नदी खोर्‍यांचे नकाशे, पूर रेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाले, पावसाच्या नोंदी, यापूर्वीच्या पूर, दुष्काळाच्या नोंदीची माहिती संकलित करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवणे, अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे आणि नदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करावा लागणार

या अभियानांतर्गंत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. दि. 1 डिसेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीत यात्रेचा दुसरा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. दि. 1 जानेवारी ते दि. 20 जानेवारी या कालावधीत नद्यांच्या केलेल्या अभ्यासाचा अहवाल अंतिम केला जाणार आहे. दि. 22 जानेवारीपर्यंत हा अहवाल राज्य शासनाच्या समन्वयक विभागाकडे जिल्हाधिकार्‍यांना सादर करावा लागणार आहे. दि. 26 जानेवारी 2023 पर्यंत नद्यांवर यात्रा होणार आहे.

Back to top button