जोतिबा डोंगरावरील ‘सुंदर’ हत्तीचे कर्नाटकमध्ये निधन | पुढारी

जोतिबा डोंगरावरील ‘सुंदर’ हत्तीचे कर्नाटकमध्ये निधन

जोतिबा डोंगर, पुढारी वृत्तसेवा : वारणा समूहाकडून आमदार विनय कोरे यांच्यामार्फत श्री क्षेत्र जोतिबा देवास ‘सुंदर’ हत्ती भेट म्हणून देण्यात आला होता. त्याचे 27 ऑगस्टला निधन झाले. कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये गेलेल्या भक्तांनी रविवारी ही माहिती फोनद्वारे दिली.

‘पेटा’ या संस्थेने हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करून प्राणी संग्रहालयात सोडावे, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. दरम्यानच्या काळात ‘सुंदर’ हत्ती वारणानगर येथे वास्तव्यास होता.नंतर वारणेतून कर्नाटक इथल्या बाणेरगठ्ठा पार्कमध्ये ‘सुंदर’ला नेण्यात आले. कोल्हापूर येथील काही जोतिबा भक्त दीड-दोन महिन्यांतून केळे, सफरचंद घेऊन खास ‘सुंदर’ला भेटण्यासाठी जात. दोन दिवसांपूर्वी ते तिथे गेले असता तेथील प्रशासनाने ‘सुंदर’ हत्तीचे 27 ऑगस्ट रोजी निधन झाल्याचे सांगितले.

निधनाची माहिती का लपवली? : आ. कोरे

अरुणाचल प्रदेशमधून ‘सुंदर’ हत्तीस आणून वारणा समूहाने जोतिबा देवस्थानला भेट दिला होता. कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये गेलेल्या भक्तांनी रविवारी आ. कोरे यांना ‘सुंदर’च्या निधनाची माहिती फोनद्वारे दिली. यावेळी आ. कोरे यांना अश्रू अनावर झाले. ‘सुंदर’ हा जोतिबा दैवताच्या पालखीचा मानकरी होता. निधनाची माहिती वास्तविक वारणेसह जोतिबा देवस्थानला कळविणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्याने भाविकांसह वारणा परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button