कोल्हापूर : दानोळी येथील महिला ओढ्यातून वाहून गेली | पुढारी

कोल्हापूर : दानोळी येथील महिला ओढ्यातून वाहून गेली

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : नरंदे (ता. हातकणंगले) येथील गिड्डे ओढ्याला पूर आल्याने दानोळी येथील आनंदी गणेश राजमाने (रा. दानोळी) ही महिला वाहून गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

दरम्यान, याच ओढ्यातून वाहून जाणारे आणखी चार जण वाचले आहेत. बचावलेल्यांमध्ये रमेश आण्णासो सांगळे, सदाशिव नंदू थोरात, दादासो गुरुलिंग क्षीरसागर व लक्ष्मीबाई कोळी (सर्वजण रा. दानोळी) यांचा समावेश आहे. आनंदी व वरील चौघेजण नरंदे येथे मजुरीसाठी गेले होते. दिवसभर काम आटोपून ते परतत असता मुसळधार पाऊस पडल्याने गिड्डेे ओढ्याला पूर आला होता. हे सर्वजण ओढा पार करत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे पाचही जण तोल जाऊन पाण्यात पडले.

मात्र रमेश सांगळे, सदाशिव थोरात, दादासो क्षीरसागर व लक्ष्मीबाई कोळी या चौघांना झाडाचा आधार मिळाल्याने ते ओढ्याच्या बाहेर आले.परंतु आनंदी यांना आधार न मिळाल्याने त्या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेल्या. गावकर्‍यांनी त्यांचा शोध घेण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला. या महिलेच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांना दोन विवाहित मुली आहेत.

Back to top button