कोल्हापूर : डेंग्यूचा वाढता धोका! | पुढारी

कोल्हापूर : डेंग्यूचा वाढता धोका!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील स्वाईन फ्लू, कोरोना संसर्ग आटोक्यात आला आहे; तर डेंग्यू डासांचा डंख जीवघेणा ठरू लागला आहे. दुसरीकडे, वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, पोटदुखी यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत डेंग्यूचे 277 रुग्ण सापडले, तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ऊन-पावसामुळे साथीच्या तापाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तापाच्या प्राथमिक लक्षणांकडे होणारे दुर्लक्ष हे इतर साथीच्या आजारांचे कारण ठरत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशाप्रकारच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. डेंग्यूचा ‘ताप’ कायम आहे. डेंग्यू डासांचा उपद्रव मार्चपासून सुरू आहे. चिकुनगुनियाने तर रुग्णांचे अंग मोडून काढले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आहे; तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे डेंग्यूबाधित गावांचा, परिसराचा सर्व्हे करून रुग्णशोध आणि तपासणीवर भर दिला आहे. स्वच्छता, जनजागृती याकडे आरोग्य विभागाचा डोळेझाकपणा सुरू आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवरील आरोग्य यंत्रणा सुस्त आहे. डेंग्यूचा उद्रेक होण्यापूर्वी औषध फवारणी, स्वच्छता, रुग्ण तपासणी मोहीम गतिमान करणे गरजेचे आहे.

…हे आहेत डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट’

शहर : कसबा बावडा, रमणमळा, राजारामपुरी, ताराबाई पार्क, यादवनगर, मोरे-मानेनगर, जवाहरनगर, सिद्धार्थनगर, कनाननगर, सीपीआर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, शाहूपुरी, मार्केट यार्ड, कदमवाडी, बुधवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, मध्यवर्ती बसस्थानक, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, संभाजीनगर, सानेगरुजी वसाहत, सर्व्हेनगर.

ग्रामीण : इचलकरंजी, कोडोली, पाचगाव, उचगाव, गोकुळ शिरगाव, शिरोली पुलाची, कळंबा, सरनोबतवाडी, जयसिंगपूर, राशिवडे, घाणवडे, चांदे, भेंडवडे, कणेरी, यळगूड, चिंचवाड, केकले, खाटांगळे, कुंभोज, गडहिंग्लज, आजरा, मुडशिंगी, उचगाव.

Back to top button