कोल्हापूर : लसीकरणानंतर बालक दगावल्याने जमावाकडून आरोग्य केंद्रात तोडफोड | पुढारी

कोल्हापूर : लसीकरणानंतर बालक दगावल्याने जमावाकडून आरोग्य केंद्रात तोडफोड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लसीकरणानंतर दुसर्‍याच दिवशी दीड महिन्याचे बालक दगावल्याने संतप्त जमावाने सदर बाजार येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची सोमवारी तोडफोड केली. यामुळे परिसरात दिवसभर तणाव होता. शाहूपुरी पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला.

या केंद्रात आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू आहे. शुक्रवारी (दि. 30) तेथे लहान मुलांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सदर बाजार येथील दीड महिन्याच्या एका चिमुरड्याला लस देण्यात आली. दुसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 1) बालकाची प्रकृती गंभीर बनली. त्याचे प्राण वाचविण्यासाठी पालक, नातेवाईकांनी प्रयत्न केले. मात्र बालकाचा मृत्यू झाला.

यामुळे शोक अनावर झालेल्या नातेवाईकांसह नागरिक संबंधितांना जाब विचारण्यासाठी सोमवारी सकाळी केंद्रात गेले. अधिकार्‍यांना जाब विचारत असताना जमाव आक्रमक बनला. आरोग्य केंद्रातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. खिडक्यांसह टेबलावरील काचाही फोडण्यात आल्या. संगणकांसह अन्य साहित्यही केंद्र व परिसरात विस्कटून टाकण्यात आले. या अनपेक्षित प्रकारामुळे केंद्रासमोर मोठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला. ही माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी, सहायक निरीक्षक श्रीकांत इंगवले यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यानंतर जमावाची पांगापांग झाली. तोडफोड करणार्‍याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Back to top button