कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

कोल्हापूर, गौरव डोंगरे : वेगवेगळ्या शस्त्रक्रिया, प्रसूती, अपघातग्रस्तांसाठी रक्त मिळवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रपरिवाराची एकच धांदल उडते. प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट वेगळा असल्याने घरच्या व्यक्तीलाही रक्त देता येत नसते. अशावेळी रक्तदानाची खरी गरज लक्षात येते. एका रक्ताच्या थैलीतून प्लेटलेट्स, प्लाझ्मा, पीसीव्ही, होल ब्लड असे घटक घेऊन ते चौघांना उपयोगात आणता येऊ शकते. सीपीआर शासकीय रक्तपेढीत महिन्याकाठी एक हजार रक्तथैल्यांची गरज भासते. सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असून, रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येण्याची गरज आहे.

वेगवेगळ्या आजारांमध्ये रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासते. प्रसूतीमध्ये मातेला किंवा नवजात बालकालाही रक्ताची आवश्यकता असते. अपघातानंतर मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी त्याला रक्त चढवावे लागते. अलीकडे डेंग्यूसह अनेक व्हायरसचा शिरकाव झाल्याने अनेकांना या रक्तातील घटकांची गरज भासते आहे.

डेंग्यूची साथ अन् प्लेटलेट्ससाठी धावपळ

सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ सुरू आहे. रक्तातील प्लेटलेट्स झपाट्याने कमी होत असल्याने अशा रुग्णांना तातडीने प्लेटलेट्स चढविण्याची गरज भासते. रक्तदाता पंधरा दिवसांतून अशा प्लेटलेट्स देऊ शकतो. परंतु, प्लेटलेट्ससाठी संबधित रक्तदाता खेळाडू, व्यायामपटू, कष्टाची कामे करणारा असेल तर त्याच्या शिरा स्पष्ट दिसतात. त्यामुळे त्यांच्याकडून अशा प्लेटलेट्स सहज उपलब्ध होतात. अशा लोकांनी स्वत:हून पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

पाच वेगवेगळे घटक

निरोगी व्यक्तीच्या रक्तातून प्लाझ्मा, रँडम डोनर प्लेटलेट्स, सिंगल डोनर प्लेटलेट्स, होल ब्लड आणि पी.सी.व्ही. असे घटक वेगवेगळे करता येतात. ज्या रुग्णाला ज्या घटकाची आवश्यकता असते, त्यानुसार त्याला ते उपलब्ध करून दिले जाते. जिल्ह्यातील ब्लड बँकांमध्ये हे काम सुरू असले तरी रक्तदात्यांच्या नियमिततेवर येथील साठा अवलंबून असतो. अनेकदा रक्ताचा तुटवडा असेल तर बँकांकडे नावे असणार्‍या रक्तदात्यांना शोधून त्यांना रक्तदान करण्यासाठी विनवणी करावी लागते.

75 हून अधिकवेळा प्लेटलेट्स दान

एक व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते, तर प्लेटलेट्स प्रत्येकी पंधरा दिवसांनी देता येतात. कोल्हापुरात तब्बल 75 हून अधिकवेळा प्लेटलेट्स दान करणार्‍या व्यक्तीही मोठ्या प्रमाणात आहेत. रक्तदान दिनानिमित्त यापैकी अभिजित बुधले, शैलेश बांदेकर, धनंजय पाडळकर यांचा सत्कार करण्यात आला.

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे रक्त बदलावे लागते. काही रुग्णांना पंधरा दिवसांतून एक ते दोन रक्तथैल्यांची गरज भासते. जिल्ह्यात सध्या थॅलेसेमिया रुग्णांची संख्या 290 च्या घरात असून, यांच्यासाठी प्रत्येक महिन्याला सहाशे ते आठशे रक्तथैल्या जमा करण्याचे आव्हान असल्याचे फाईट अगेन्स थॅलेसेमिया ऑर्गनायजेशनचे धनंजय नामजोशी यांनी सांगितले.

रक्ताची थैली 42 दिवसांपर्यंत सुरक्षित

रक्त जमा झाल्यानंतर तिथून पुढे 42 दिवसांपर्यंत थैली सुरक्षित समजली जाते. यानंतर ती उपयोगात न आल्यास तिची विल्हेवाट लावण्यात येते. रक्तपेढीवरून रक्त घेताना रुग्णाच्या नातेवाईकांनीही याची खातरजमा करूनच रक्त घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

उपलब्ध रक्तसाठा (1 ऑक्टोबर)
सीपीआर रक्तपेढी : 107
डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढी : 122
महापालिका रक्तपेढी : 43
अर्पण ब्लड बँक : 828

Back to top button