कोल्हापूर : नवदुर्गा दर्शनासाठी कोल्हापूर फुलले; पंचमीच्या त्र्यंबोली यात्रेचीही जय्यत तयारी | पुढारी

कोल्हापूर : नवदुर्गा दर्शनासाठी कोल्हापूर फुलले; पंचमीच्या त्र्यंबोली यात्रेचीही जय्यत तयारी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सवाच्या तृतीयेला म्हणजेच बुधवारी भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर अक्षरश: फुलले होते. करवीर निवासिनी अंबाबाईसह जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, टेंबलाई टेकडीवरील त्र्यंबोली आणि नवदुर्गा मंदिरांमध्ये स्थानिकांबरोबरच ठिकठिकाणांहून आलेल्या भाविक-पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात 1 लाख 49 हजार 580 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे.

अंबाबाईची सिद्धीदात्री रूपात पूजा

नवरात्रौत्सवातील अश्विन शुद्ध तृतीयेला म्हणजेच बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाईची ‘श्री सिद्धीदात्री’ रूपात पूजा बांधण्यात आली होती. सिद्धीदात्री हे नवदुर्गातील अंतिम रूप. जेव्हा मार्कंडेय मुनी यांनी ब—ह्मदेवांना मला जगातील गुहृय गोष्ट सांगा, अशी विनंती केली, तेव्हा ब—ह्मदेवांनी परम गुप्त असं लोकांवर उपकार करणारे देवी कवच सांगितले. या देवी कवचाच्या प्रारंभीच या नवदुर्गांचा उल्लेख आला आहे. शैलपुत्रीपासून सुरू झालेली ही मालिका ब—ह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री अशा क्रमांकाने पूर्ण होते.

यातील सिद्धीदात्री म्हणजे आपल्या उपासनेचे पूर्ण फल प्रदान करणारी देवी. सिद्धी म्हणजेच सामर्थ्य. अष्ट महासिद्धी या जगप्रसिद्ध आहेत. परंतु, केवळ त्या असणं म्हणजे सिद्ध नव्हे तर तर या सिद्धींच्या असण्यानेही ज्याच्या मनाच्या किंवा साधनेच्या कुठल्याही पातळीत फरक पडत नाही तो खरा सिद्ध. अशा सिद्धांची स्वामिनी म्हणजे ही सिद्धीदात्री. देव-दैत्य-मानव असे सर्वजण तिची सेवा करतात, अशी ही नवदुर्गा हातामध्ये गदा-चक्र-शंख व पद्म धारण करते. कमलासनावर विराजमान अशा या दुर्गेची पूजा अनिलराव कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी व गजानन मुनीश्वर यांनी साकारली होती.

संबंधित बातम्या

सांस्कृतिक कार्यक्रमांची विविधता

बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रम झाले. कृष्णविहार भजनी मंडळ टेंबलाईवाडी, स्वरगंधा महिला भजनी मंडळ, ज्ञानेश्वरी महिला व विठूमाऊली भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, महालक्ष्मी महिला सोंगी भजनी मंडळ, समर्थ ग्रुपचा भावगीत कार्यक्रम, इचलकरंजीच्या सायली होगाडे यांचे कथ्थक यासह पुण्याच्या सौ. शुभांगी मुळे यांचा ‘गीत बहार’ हा कार्यक्रम झाला.

त्र्यंबोली यात्रेची जय्यत तयारी

नवरात्रौत्सवाच्या पंचमीला म्हणजेच शुक्रवारी (दि. 30) त्र्यंबोली यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने टेंबलाई टेकडी परिसरात विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासन व महापालिकेसह विविध शासकीय विभागांच्या वतीने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन तयारी करण्यात आली आहे. यात्रेसाठी विविध प्रकारची खेळणी सज्ज झाली आहेत. भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगचेही नियोजन केले आहे.

महालक्ष्मी अन्नछत्रतर्फे मोफत बससेवा

त्र्यंबोली देवीच्या दर्शनासाठी भाविकांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीने बिंदू चौक ते टेंबलाई आणि परत बिंदू चौक अशी मोफत बससेवा असणार आहे. यासाठी 4 बसेस सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मोफत बससेवेची वेळ सकाळी 6 ते रात्री 11 अशी असणार असून भाविकांनी लाभ याचा घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.

मंदिर परिसरातील बारीक खडीचा त्रास

नवरात्रौत्सवामध्ये मंदिराकडे येणार्‍या मार्गांवर मनपा प्रशासनाने खडी पसरली आहे. रणरणत्या उन्हात अनवाणी पायाने येणार्‍या भाविकांना या खडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

व्हाईट आर्मीतर्फे तातडीची मदत

अंबाबाई मंदिर परिसरात आलेल्या छाया लक्ष्मण मोरबाळे (वय 54, रा. आजरा) या महिलेला बुधवारी दुपारी अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. व्हाईट आर्मीच्या जवानांनी तातडीने या महिलेला प्रथमोपचार अ‍ॅम्ब्युलन्समधून सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

तीन दिवसांत 453 रुग्णांवर उपचार

अंबाबाई मंदिर व परिसरात आरोग्य विभागासह, खासगी रुग्णालये, सामाजिक संघटनांची वैद्यकीय पथके रुग्णसेवेत आहेत. गेल्या तीन दिवसांत 453 रुग्णांवर उपचार झाले. काहींना प्राथमिक उपचार देण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाचे काम तीन शिफ्टमध्ये चालू आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी 1, निवासी डॉक्टर 2 आणि अन्य स्टाफचा समावेश आहे. सीपीआरच्या दगडी बिल्डिंग येथे बेड, व्हेंटिलेटरसह वॉर्ड तयार ठेवला आहे.

तिरुपती मंदिर शिखर आकारात पालखी

नवरात्रौत्सवाच्या तिसर्‍या दिवशी (बुधवार) रात्री करवीर निवासिनी अंबाबाईचा पालखी सोहळा उत्साहात झाला. तिरुपती बालाजी मंदिराच्या शिखराच्या आकारातील पालखी लक्षवेधी होती. जरग कुटुंबीयांच्या वतीने सप्तरंगी फुलांची आकर्षक पालखी सजावट करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते रात्री पालखी सोहळा सुरू झाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मानकर्‍यांच्या सेवाभावात पालखी प्रदक्षिणा झाली. यावेळी भाविक-पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button