कोल्हापूर : काळाची गरज ओळखून योग्य शाखा निवडल्यास करिअर यशस्वी होईल | पुढारी

कोल्हापूर : काळाची गरज ओळखून योग्य शाखा निवडल्यास करिअर यशस्वी होईल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : इंजिनिअरिंग, फार्मसी व डेंटल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना मित्र, नातेवाईक एका विशिष्ट शाखेत आहे म्हणून ती शाखा निवडू नये. काळाची गरज व आवड लक्षात घेऊन चौकसपणे व डोळसपणे योग्य ती शाखा निवडल्यास यशस्वी करिअर करणे शक्य आहे, असा मंत्र तज्ज्ञ मान्यवरांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाला.

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, कोल्हापूर-सांगली व दै. ‘पुढारी’ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृह येथे विद्यार्थी व पालकांसाठी ‘करिअर मार्गदर्शन व प्रवेश प्रक्रिया 2022’ या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र झाले. याप्रसंगी भारती विद्यापीठ पुण्याचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. विजय घोरपडे म्हणाले, इंजिनिअर हा तंत्रज्ञानाचा एक अविभाज्य घटक आहे. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच सध्या इंटरनेट ही चौथी गरज बनली असून यासाठी इंजिनिअर्सचे योगदान मोलाचे आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडियामुळे इंजिनिअर्सचे महत्त्व वाढत आहे. इंजिनिअरिंगच्या विविध शाखांमुळे शासकीय बरोबरच खासगी कंपन्यांत नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज, कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे म्हणाले, बारावीनंतर कोणता अभ्यासक्रम निवडतो, त्यावर विद्यार्थ्यांचे करिअर ठरते. त्यासाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड महत्त्वाची आहे. आरोग्य व्यवस्थेत फार्मसी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना काळात औषध उद्योगांची वाढ झाली असून 2030 पर्यंत याची उलाढाल 6 ट्रिलीयन डॅालर होईल. डिप्लोमा इन फार्मसी, बॅचलर ऑफ फार्मसी, मास्टर्स इन फार्मसीमध्ये 18 शाखा आहेत. बी. फार्मसी झाल्यावर 14 प्रकारच्या रोजगाच्या संधी आहेत. अ‍ॅकॅडमिक, इंडस्ट्री, रिसर्च याबरोबर परदेशातही अनेक संधी उपलब्ध आहेत.

भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज, सांगलीचे प्रा. डॉ. चेतन पाटील यांनी केंद्र व राज्यशासन यांची वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया पद्धती आणि विविध कोर्सेसची माहिती दिली. प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा भरावा, रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे, शाखा निवड, प्रवेश फेर्‍या, आरक्षण, आवश्यक गुण याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे साहाय्यक प्रा. असित कित्तुर यांनी इंजिनिअरिंग, फार्मसी, डेंटल अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. कुठल्या शाखेत काय करता येऊ शकते, असा विद्यार्थ्यांनी विचार करण्यापेक्षा मी एका विशिष्ट शाखेत काय करू शकतो, याचा विचार करावा. त्याप्रमाणे शाखा निवडावी. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर विद्यार्थी व पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. चर्चासत्राचे नियोजन राहुल कदम यांनी केले. डॉ. केदार जोशी यांनी आभार मानले.

Back to top button