‘राष्ट्रवादी आमचं देणं लागतो, ते दिलंच पाहिजे : राजू शेट्टी | पुढारी

'राष्ट्रवादी आमचं देणं लागतो, ते दिलंच पाहिजे : राजू शेट्टी

इचलकरंजी : संदीप बिडकर  राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्याचा निवडणुकीपूर्वी ‘शब्द’ दिला आहे. त्यांच्या यादीमध्ये आमच्या पक्षातर्फे माझ्या नावाचा समावेश होता. परंतु, सध्या माध्यमातून वेगळ्याच चर्चा ऐकायला मिळत आहेत. त्याबाबत आपण चिंता करीत नाही. सर्वसामान्य नागरिक व सध्या अडचणीत असणार्‍या पूरग्रस्तांसाठी आपण लढत राहणारच. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा देताना जो फॉर्म्युला ठरला, त्याप्रमाणे ‘राष्ट्रवादी आमचं देणे लागतो, त्यांनी ते द्यावे,’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्‍त केले.

पंचगंगा परिक्रमा पदयात्रेनिमित्त ते शुक्रवारी चोकाक, अतिग्रे, रुकडी परिसरात आल्यानंतर ते दै. ‘पुढारी’शी बोलत होते. गत लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार हातकणंगलेसह सांगली लोकसभेची एक जागा काँग्रेसकडून स्वाभिमानीला मिळाली. सांगलीतून काँग्रेसचेच विशाल पाटील यांनी स्वाभिभमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निवडणूक लढविली, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला. त्यावेळी राष्ट्रवादीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेची एक जागा हवी होती.

परंतु, ती त्यांना त्यावेळी मिळाली नाही. त्याऐवजी राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेसाठी स्वाभिमानीला एक जागा देऊ, असा शब्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता, असेही शेट्टी यावेळी म्हणाले. त्यानुसार राज्यपालनियुक्‍त आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानीला एक जागा देण्यात आली आहे.

परंतु, सध्या पराभूत खासदारांच्या नियुक्‍तीबाबत खल सुरू आहे. त्याबाबत शेट्टी म्हणाले, राष्ट्रवादी आमचं देणे आहे, त्यांनी ते दिलंच पाहिजे. लोकसभा निवडणुकीवेळीच निधानपरिषदेची एक जागा स्वाभिमानीला देण्याचा शब्द राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिला आहे. त्यांनी तो पाळावा, असेही शेट्टी म्हणाले.

Back to top button