कोल्हापूर : हद्दवाढीसाठी कृती समिती आज केएमटी बस रोखणार | पुढारी

कोल्हापूर : हद्दवाढीसाठी कृती समिती आज केएमटी बस रोखणार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : हद्दवाढीस विरोध करणार्‍या गावांतील केएमटी बससेवा बंद करावी, अशी मागणी करून महापालिका प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे महापालिका व केएमटी बचाव मोहीम म्हणून कोल्हापूर शहर हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीतर्फे सोमवारी (दि. 12) पहाटे पाच वाजता केएमटी रोखण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन शहर पोलिस उपअधीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे आणि महापालिका प्रशासनास दिले आहे. अशी माहिती समितीचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून केएमटीचे ग्रामीण भागातील तोट्यातील 24 पैकी 22 मार्ग बंद करा, अशी कृती समितीची मागणी आहे. तोट्यातील मार्गांमुळे केएमटीचे एक कोटी 60 लाख रुपये नुकसान होत आहे. एवढ्या रकमेतून शहरातील विकासकामे झाली असती. मात्र, केएमटीवर खर्च होत असल्याने प्रत्यक्षरित्या विकासकाम रोखले जात आहे.

महापालिका प्रशासन कृती समितीच्या तोट्यातील मार्ग बंद करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे केएमटीतील चालक, वाहक, सुपरवायझर यांचे पगार आणि निवृत्तांना पेन्शनही वेळेत मिळत नाही. तर दुसरीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे पगार मात्र वेळेत होत आहेत. त्यामुळे केएमटी बचाव व महापालिका बचावसाठी शहरात विकासाची गंगा आणण्याचे अभियान राबवत आहोत. याअंतर्गत सोमवारी (दि. 12) पहाटे पाच वाजता कृती समितीचे कार्यकर्ते बुद्ध गार्डन येथील वर्कशॉपमधून केएमटी बस बाहेर पडू देणार नाहीत. सर्व बसेस रोखण्यात येणार आहेत.

पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, किशोर घाडगे, विवेक कोरडे यांच्या सह्या आहेत.

Back to top button