गणेश विसर्जन मिरवणुकींचा जल्लोष दुसऱ्या दिवशीही कायम!  | पुढारी

गणेश विसर्जन मिरवणुकींचा जल्लोष दुसऱ्या दिवशीही कायम! 

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर काल शुक्रवारी (दि.9) अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना सकाळपासून आरती करून निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका सुरु झाल्या. यावेळी डोळ्यात आनंदआश्रू, ढोल-ताशांच्या गजरात, गणपत्ती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! अशी बाप्पांना भावपूर्ण विनवणी करून विसर्जन मिरवणुका फुलल्या. काल सकाळपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुका आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहेत. बाप्पाच्या मिरवणूकींचा उत्साह दुसऱ्या दिवशी कायम आहे. गणपती बाप्पांना निरोप देणा-या घोषणांनी आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने, ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला आहे.

कोल्हापूरमध्ये दोन वर्षानंतर ढोल ताशांच्या गजरात कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. तुकाराम माळी मंडळाच्या मानाच्या गणपतीची मनोभावे पूजा झाल्यानंतर कोल्हापूर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. आज दुस-या दिवशीही मिरवणुकांचा उत्साह कायम आहे.

पुण्यामध्ये सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपतीला मान दिला जातो. या गणपतींच्या आगमनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी होती आज दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष कायम आहे. मुंबईमध्येही लालबागचा राजा गणपती विसर्जन मिरवणुकीने सुरुवात झाली. लालबागचा राजा मिरवणूक खूप वेळ रंगली तब्बल 22 तासाच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी सर्व गणेशभक्त उत्साहात मिरवणुकीत सहभागी होत आहेत.

बाप्पाचे विसर्जन सुरळीत व्हावे, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस, महानगरपालिका यासह सर्व यंत्रणा सज्ज होत्या. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात आहे.

मिरवणुकीत ढोल-ताशांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

बाप्पांची विसर्जन मिरवणूक म्हणजे हा खूप मोठा सोहळा असतो. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे आतूर झालेले असतात. अतिशय शिस्तबद्ध पणे ढोल ताशाच्या गजरात लेझिम, काठी, मर्दानी खेळ, डीजे, आकर्षक रोषणाई त्यात प्रत्येक मंडळाच्या मिरवणुकीत केलेले वेगवेगळे पेहराव, कुठे महिलांनी खेळलेला फुगडीचा खेळ तर कुठे रिंगण करून घातलेला झिम्मा, कुठे गुलाल तर कुठे हळदीचा भंडारा, कुठे फुलांची उधळण, कुठे पोवाडे तर चित्रपटातील गाण्यांच्या डिजेवर थिरकणारी तरुणाई असा हा सोहळा कालपासून सुरू झाला असून आजही याचा जल्लोष कायम आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button